अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण
By Admin | Updated: October 10, 2016 01:50 IST2016-10-10T01:50:25+5:302016-10-10T01:50:25+5:30
परतीच्या पावसाचा विदर्भासह यवतमाळ जिल्ह्याला मोठा फटका बसला. खरिपाचे प्रचंड नुकसान झाले.

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण
आदेश : ६७ हजार हेक्टर नुकसानीचा अंदाज
यवतमाळ : परतीच्या पावसाचा विदर्भासह यवतमाळ जिल्ह्याला मोठा फटका बसला. खरिपाचे प्रचंड नुकसान झाले. यासंदर्भात सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. यासोबतच विमा कंपनीच्या बंद असलेल्या दूरध्वनी संदर्भात कारवाई करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी प्रधान सचिवांना दिली आहे.
यंदा सुरुवातीला खरीप पिकांची स्थिती अतिशय उत्तम होती. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असतानाच पावसाने दडी मारली. त्यानंतर पीक काढणीला आले असताना परतीच्या पावसाने कहर केला. गत तीन आठवड्यांपासून यवतमाळ जिल्ह्यात दररोज पाऊस कोसळत आहे. त्यामुळे काढणीला आलेला सोयाबीन उद्ध्वस्त झाला. अनेक ठिकाणी सोयाबीनला कोंब फुटले. तर पऱ्हाटीचेही प्रचंड नुकसान झाले. प्राथमिक अहवालानुसार यवतमाळ जिल्ह्यात ६७ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. त्यात २२ हजार हेक्टर सोयाबीनला कोंब फुटल्याचे म्हटले आहे. या शेतकऱ्यांंना तत्काळ मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वेक्षणाचे आदेश दिले आहे. त्यानुसार नुकसानग्रस्त भागात तलाठी आणि कृषी विभागाच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर शासन या शेतकऱ्यांना मदत देईल, अशी अपेक्षा आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अद्यापही पाऊस थांबायचे नाव घेत नाही. अशा स्थितीत जिल्ह्यात सर्वेक्षण करताना तलाठी आणि कृषी विभागाची दमछाक होणार आहे. एका तलाठ्याकडे अनेक गावे असल्याने संबंधित कालावधीत तलाठी शेतापर्यंत पोहोचण्यासही वेळ लागणार आहे. परंतु या सर्वेक्षणानंतर शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. आता गावागावात जाऊन तलाठी नुकसानीचे सर्वेक्षण करणार आहे. (शहर वार्ताहर)
विमा कंपनीची कानउघाडणी
४यवतमाळ जिल्ह्यातील पीक विमा रिलायन्स कंपनीने काढला आहे. या कंपनीच्या नियमानुसार नुकसान झाल्यास ४८ तासात संबंधित कंपनीला दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर कळविणे आवश्यक आहे. परंतु गत महिनाभरापासून टोल फ्री क्रमांक आणि फॅक्स बंद आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. याची दखल पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतली. त्यांनी कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यांच्याशी संपर्क साधला. कंपनीचा निष्काळजीपणा त्यांना सांगितला. त्यावरून प्रधान सचिवांनी कारवाईचे पाऊल उचलले असून लवकरच हा दूरध्वनी सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.