‘हाय वे’ नको, पांदण रस्तेच बरे

By Admin | Updated: December 20, 2014 22:47 IST2014-12-20T22:47:48+5:302014-12-20T22:47:48+5:30

सुमारे १० वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या दळणवळणासाठी तसेच महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठा गाजावाजा करीत नागपूर हैद्राबाद महामार्ग क्रमांक सातच्या चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले. तथापि कंत्राटदाराने

'Hi Way', the pedestal is good | ‘हाय वे’ नको, पांदण रस्तेच बरे

‘हाय वे’ नको, पांदण रस्तेच बरे

नागरिकांचा सूर : राष्ट्रीय महामार्गाची झाली प्रचंड दुर्दशा
प्रवीण पिन्नमवार - पांढरकवडा
सुमारे १० वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या दळणवळणासाठी तसेच महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठा गाजावाजा करीत नागपूर हैद्राबाद महामार्ग क्रमांक सातच्या चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले. तथापि कंत्राटदाराने काम अर्धवट सोडल्याने आता या महामार्गाची अत्यंत दययीय अवस्था झाली. त्यामुळे आता ‘हाय वे’ नको, पांदण रस्तेच बरे म्हणण्याची वेळ आली आहे.
केळापूर ते पिंपळखुटी, तसेच हिंगणघाट ते करंजी, या दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग प्रचंड दुरवस्थेत आहे. या महामार्गावरून लाखो प्रवाशांना अक्षरश: मरण यातना सहन करतीच पुढील प्रवास करावा लागत आहे. या महामार्गाच्या काठावरील गावांतील ग्रामस्थांना अनेक आजार, व्याधी जडून यातना सहन कराव्या लागत आहेत. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत अनेक आंदोलने झाली. शासनाला संबंधित विभागाला निवेदने देण्यात आली. मात्र प्रत्येकवेळी पुढील वर्षीपर्यंत रस्ता दुरूस्त होईल, अअशीच तारीख देऊन बोळवण करण्यात आली.
हा महामार्ग तयार करणे तर सोडाच, साधा दुरूस्तसुद्धा करण्यात आला नाही. नुकतेच या नादुरूस्त रस्त्याचे काम ३१ मार्च २०१५, तर चौपदरीकरणाचे काम ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य व्यवस्थापक एम.के.जैन यांनी दिली. या महामार्गाचे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ही ग्वाही दिली. या महामार्गाच्या दुरवस्थेबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यात जैन यांनी व्यक्तिश: न्यायालयात उपस्थित राहून अशी ग्वाही दिल्याची माहिती आहे. आता या प्रकरणात पुढील सुनावणी येत्या २४ डिसेंबरला होणार आहे. एकूणच या महामार्गासाठी ‘तारीख पे तारीख...’चाच अनुभव नागरिकांना येत आहे.
चांगले रस्ते उपलब्ध झाल्यास परिसराचा, देशाचा विकास होतो. शेतकऱ्यांना शहराला जोडून बाजारपेठेची सुविधा उपलब्ध होते. वेळेची बचत होऊन देशाच्या विकासात भर पडते. या उदात्त हेतूने सरकारने देशात रस्ते तयार करण्याकरिता मोहिमच हाती घेतली होती. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातच्या चौपदरीकरणाचे काम १० वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. मात्र इतकी वर्षे आणि इतका त्रास, हा महामार्ग तयार करण्यासाठी होत असेल, तर महामार्ग नको, आम्हाला सरकारने पांदण रस्तेच तयार करून द्यावेत, असा सूर आता नागरिकांमध्ये उमटत आहे.

Web Title: 'Hi Way', the pedestal is good

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.