दमदार पावसाची हजेरी
By Admin | Updated: June 19, 2014 00:17 IST2014-06-19T00:17:59+5:302014-06-19T00:17:59+5:30
मृग नक्षत्रातला पहिला पाऊस मंगळवारी जिल्हयात बरसला. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पहिल्याच पावसाने जिल्ह्यात ३७ मिमीची नोंद केली आहे. सर्वाधिक ७३ मिमी पावसाची नोंद

दमदार पावसाची हजेरी
३७ मिमी पाऊस : यवतमाळात सर्वाधिक पावसाची नोंद
यवतमाळ : मृग नक्षत्रातला पहिला पाऊस मंगळवारी जिल्हयात बरसला. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पहिल्याच पावसाने जिल्ह्यात ३७ मिमीची नोंद केली आहे. सर्वाधिक ७३ मिमी पावसाची नोंद यवतमाळात करण्यात आली. जिल्ह्यात कमी अधिक स्वरूपात सर्वत्र पाऊस बरसला. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे.
गत वर्षी मृग नक्षत्राच्या प्रारंभा पासूनच पावसाने हजेरी लावली होती. यावर्षी तब्बल ११ दिवस उशिराने पाऊस आला. त्यामुळे पेरणी खोळंबल्याचे चित्र जिल्ह्यात पहायला मिळाले. गतवर्षी १८ जुन पर्यंत ४० टक्के पेरण्या आटोपल्या होत्या. यावर्षी पेरण्या लांबल्या आहेत.
जिल्ह्यात उशिरा धडकलेल्या मानसुनने पेरण्या खोळंबल्या आहे. पेरण्या लांबल्याने मुग आणि उडीदाचे क्षेत्र घटन्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर तुरीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.
न मिळणारे सोयाबीनचे बियाणे आणि अशिरा लांबलेल्या पेरण्या यामुळे कापसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या नियोजनात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.
गत २४ तासात सर्वाधिक पावसाची नोंंद यवतमाळात करण्यात आली. या ठिकाणी ७३.०४ मिमी पाऊस बरसला. कळंब तालुक्यात ५८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. बाभुळगाव तालुक्यात ५३ मिमी पाऊस बरसला. आर्णी २९मिमी, दारव्हा ४२ मिमी, दिग्रस १७ मिमी, नेर ७० मिमी, पुसद १ मिमी, महागाव १३ मिमी, केळापूर १३ मिमी, घाटंजी २८ मिमी, राळेगाव ६२ मिमी, वणी ४६ मिमी, मारेगाव ५६ मिमी तर झरी तालुक्यात ३८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.
या पावसामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला असून अनेकांनी पेरणीची तयारी चालविली आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच निसर्गाने शेतकऱ्यांसोबत लपंडाव केला आहे. सुरुवातीला अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातून खरिपाचा हंगाम गेला. त्यानंतर रबी हंगामापासून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. रबीतील पिकेसुद्धा चांगीच बहरली होती. परंतु पिके काढणीला आल्यावर जिल्ह्यात अचानक मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. या सर्व संकटातून सावरत शेतकरी आता पुन्हा नव्या जोमाने खरिपाच्या लागवडीसाठी सज्ज झाल्याचे दिसून येते.
(शहर वार्ताहर)