९३ हजार तक्रारींची सुनावणी रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 22:01 IST2018-02-11T22:01:03+5:302018-02-11T22:01:29+5:30
बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या जिल्ह्यातील ९३ हजार शेतकऱ्यांच्या तक्रारींची सुनावणी लालफितीत अडकली. राज्यातील ११ लाख तक्रारींपुढे जिल्ह्यातील तक्रारींचा क्रमांकच लागला नाही.

९३ हजार तक्रारींची सुनावणी रखडली
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या जिल्ह्यातील ९३ हजार शेतकऱ्यांच्या तक्रारींची सुनावणी लालफितीत अडकली. राज्यातील ११ लाख तक्रारींपुढे जिल्ह्यातील तक्रारींचा क्रमांकच लागला नाही. त्यामुळे सुनावणी केव्हा होणार आणि मदत केव्हा मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामात बोंडअळीने कपाशीचे प्रचंड नुकसान झाले. याबाबत शेतकऱ्यांनी तालुका कृषी विभागाकडे तक्रारी करून मदतीची मागणी केली. जिल्ह्यातील १६ तालुक्यातील तब्बल ९३ हजार शेतकऱ्यांनी अधिकृत तक्रारी कृषी विभागाकडे नोंदविल्या आहे. या तक्रारींचा निवाडा करण्यासाठी कृषी गुणनियंत्रक संचालकांकडे पुणे येथे सुनावणी सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्याचा क्रमांक लागल्यानंतर सुनावणी केली जाते. राज्यातील ११ लाख शेतकऱ्यांनी बोंडअळी नुकसानीच्या तक्रारी केल्या आहे. त्यामुळे अद्यापही यवतमाळ जिल्ह्याचा क्रमांक लागला नाही. परिणामी यवतमाळ जिल्ह्याची सुनावणी अद्यापही झाली नाही. ही सुनावणी केव्हा होणार आणि मदत केव्हा मिळणार, हे सध्या तरी सांगणे अवघड झाले आहे. आतापर्यंत झालेल्या सुनावणीत सात जिल्ह्यातील नावे आली आहे. परंतु यवतमाळचा मात्र अद्यापही क्रमांक आला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.
कृषी विभाग अनभिज्ञ
जिल्ह्यातील शेतकºयांनी केलेल्या तक्रारींवर कधी सुनावणी होणार याबाबत कृषी विभागाला कृषी आयुक्तालयांकडून कुठलीही सूचना दिली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुनावणीच्या प्रतीक्षेत आहे. पुणे येथे होत असलेल्या सुनावणीत दरदिवशी १०० तक्रारींचा निपटारा केला जात आहे. त्यामुळे ९३ हजार शेतकºयांच्या सुनावणीला विलंब लागणार आहे. स्पॉट तपासणी व इतर बाबींमुळे शेतकºयांना मदत मिळण्यास विलंब होणार आहे.