केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकाच्या निलंंबनाचे निर्देश
By Admin | Updated: July 2, 2014 23:27 IST2014-07-02T23:27:17+5:302014-07-02T23:27:17+5:30
मध्यान्ह भोजनातून विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधा प्रकरणी केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकाला निलंबित करण्याची सूचना जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मनमोहनसिंग चव्हाण यांनी येथे केली.

केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकाच्या निलंंबनाचे निर्देश
ढाणकी : मध्यान्ह भोजनातून विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधा प्रकरणी केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकाला निलंबित करण्याची सूचना जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मनमोहनसिंग चव्हाण यांनी येथे केली. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आले असता त्यांनी अधिकाऱ्यांना ही सूचना केली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह अनेकांनी मुरली गावाकडे धाव घेतली. दरम्यान सर्व विद्यार्थी सुखरूप असून ८१ विद्यार्थ्यांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. तर तीन विद्यार्थी नांदेड आणि तीन विद्यार्थी उमरखेड येथे उपचार घेत आहेत. उमरखेड तालुक्यातील मुरली येथे मध्यान्ह भोजनातून ८७ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. या विद्यार्थ्यांना तत्काळ ढाणकीच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी सहा विद्यार्थ्यांना उमरखेड येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
शिक्षण सभापती मनमोहनसिंग चव्हाण यांनी मुरली आणि ढाणकी येथे भेट दिली. त्यावेळी केंद्र प्रमुख डी.एन. भिंबरवाड आणि मुख्याध्यापक एम.डी. केंद्रे यांना तत्काळ निलंबित करण्याची सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना केली. तसेच मध्यान्ह भोजन शिजविणारा भोजू चव्हाण याच्यावर पोलिसात तक्रार देण्यासाठी कायदेशीरबाबी तपासून पाहण्याची सूचना केली. बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी, उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी पाटील यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली. तसेच तालुका आरोग्य अधिकारी पी.डी. देशमुख यांच्या नेतृत्वातील पथक शाळेमध्ये तळ ठोकून आहे. एक रुग्णवाहिका मुरलीत तर दुसरी रुग्णवाहिका जेवली येथे तैनात ठेवण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे मिलिंद देशपांडे यांनी पोषण आहाराचे नमुने तपासणीसाठी घेतले. मात्र शिजलेल्या अन्नाचा नमुना शिल्लक नसल्याने विषबाधेचे कारण शोधणे कठीण झाले आहे. (वार्ताहर)