‘तो’ दारूगोळा पुरला ठाण्याच्या आवारातच
By Admin | Updated: January 3, 2015 02:06 IST2015-01-03T02:06:59+5:302015-01-03T02:06:59+5:30
लष्करी बनावटीशी साधर्म्य असलेला घातक दारूगोळा आर्णीच्या अरुणावती नदीच्या पात्रात एका बेवारस पेटीत आढळून आला होता.

‘तो’ दारूगोळा पुरला ठाण्याच्या आवारातच
यवतमाळ : लष्करी बनावटीशी साधर्म्य असलेला घातक दारूगोळा आर्णीच्या अरुणावती नदीच्या पात्रात एका बेवारस पेटीत आढळून आला होता. त्यातील हॅँडग्रेनेड (बॉम्ब) आणि काडतुस जीवंत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस ठाण्याच्या आवारातच बॉम्ब शोधक-नाशक पथकाच्या शास्त्रीय पद्धतीने पुरण्यात आले. याला सुरक्षेचे कारण असले तरी कर्मचाऱ्यांमध्ये बॉम्बची भीती निर्माण झाली आहे.
आर्णी येथील अरुणावती नदीच्या पात्रात एका पेटीत लष्करी बनावटीशी साधर्म्य असलेले तीन हॅन्ड ग्रेनेड (बॉम्ब), एके-४७ रायफलमध्ये उपयोगात येणारे २६ काडतूस आणि ९ एमएम विदेशी पिस्तुलात वापरले जाणारे तीन काडतूस असा घातक दारूगोळा आढळून आला होता. या प्रकाराने एकच एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी हा सर्व दारूगोळा जप्त केला.
तो १९६० पूर्वीचा असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या दारुगोळ््याचे काय करावे असा प्रश्न पोलिसांपुढे आहे. त्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया केली जात आहे. असे असले तरी हा दारूगोळा ठाण्याच्या मालखान्यात ठेवता येत नाही. विस्फोटक पदार्थ आणि वस्तू ठेवण्याची शास्त्रीय पद्धत आहे. त्यानुसार सुरक्षेच्या कारणास्तव बॉम्ब शोधक-नाशक पथकाच्या मदतीने एका खड्ड्यात खालून आणि वरून दोन वाळूच्या पिशव्यांमध्ये हा दारूगोळा सुरक्षितरीत्या पुरण्यात आला. आता या विस्फोटकाचा कुठलाही धोका राहिला नसल्याचे पोलिसातून सांगण्यात येते. मात्र बॉम्ब फुटेल या भीतीने अनेक कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (स्थानिक प्रतिनिधी)