पाचव्या सत्रात बी.एस्सीचे अर्धे विद्यार्थी नापास
By Admin | Updated: March 16, 2015 01:53 IST2015-03-16T01:53:28+5:302015-03-16T01:53:28+5:30
अमरावती विद्यापीठातील अनागोंदी कारभाराचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. यवतमाळातील अमोलकचंद महाविद्यालयातील बीएस्सी ..

पाचव्या सत्रात बी.एस्सीचे अर्धे विद्यार्थी नापास
यवतमाळ : अमरावती विद्यापीठातील अनागोंदी कारभाराचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. यवतमाळातील अमोलकचंद महाविद्यालयातील बीएस्सी अभ्यासक्रमाच्या पाचव्या सत्रातील परीक्षेत तब्बल अर्ध्या विद्यार्थ्यांना नापास करण्यात आले. विशेष म्हणजे परीक्षेसाठी एका वर्ग खोलीत बसलेले सर्वच विद्यार्थी नापास केले. यावरूनच उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना गोंधळ झाल्याचे स्पष्ट होते.
बीएस्सी अभ्यासक्रमाच्या पाचव्या सत्रासाठी २०१४ मध्ये परीक्षा घेण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीचे चारही सत्र चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केले. त्या विद्यार्थ्यांचा भौतिकशास्त्र विषयात नापास करण्यात आले. खेदाची बाब म्हणजे नापास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी कुणालाही दोन ते १७ पेक्षा अधिक गुण देण्यात आले नाही. तर याच सत्रातील दुसऱ्या वर्गखोलीत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र विषयात भरभरून गुणदान करण्यात आले. ५० ते ८० टक्क्याच्या दरम्यान गुण दिले. भौतिकशास्त्र या विषयाच्या पेपरची तपासणी करताना प्राध्यापकाने घोडचूक केली असावी असा संशय नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. परीक्षेसाठी एकाच वर्गात बसलेल्या ३८ विद्यार्थ्यांना नापास करण्यामागे नेमका कोणता हेतु होता असाही संशय व्यक्त केल्या जात आहे.
याबाबत विद्यार्थ्यांनी अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.ए. मिश्रा यांच्याकडे तक्रार केली. प्राचार्यांनी या तक्रारीची दखल घेऊन अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुंना पत्र लिहिले आहे. सध्यातरी मेहनत करून नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्यच टांगणीला लागले आहे. हा एक प्रकारे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होत असलेला खेळ आहे. पेपरची तपासणीत विद्यार्थ्यांची मेहनत लक्षात घेऊनच गुणांकन करावे अशी अपेक्षाही या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)