ज्ञान मंदिर नव्हे अन्न छत्रालय!
By Admin | Updated: December 21, 2014 23:06 IST2014-12-21T23:06:56+5:302014-12-21T23:06:56+5:30
ग्रामीण भागातील मुलांचे कुपोषण थांबावे, शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबावी यासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेने ज्ञान मंदिराला

ज्ञान मंदिर नव्हे अन्न छत्रालय!
पुसद : ग्रामीण भागातील मुलांचे कुपोषण थांबावे, शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबावी यासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेने ज्ञान मंदिराला अन्नछत्रालयाचे स्वरूप आले असून कल्याणकारी योजनांची खिचडी झाल्याचे प्राथमिक शाळांमध्ये दिसून येत आहे. सर्व शिक्षा अभियानाने शिक्षकांना ‘शिक्षा’ दिल्याचे सध्या तरी दिसत आहे.
शासनाने मध्यान्ह भोजन ही योजना सुरू केली. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पूरक पोषण आहार दिला जातो. शाळांमध्ये खिचडी शिजवून विद्यार्थ्यांना वितरणाची जबाबदारी अनेक गावांमध्ये बचत गटांकडे दिली आहे. शाळांमध्ये किचन शेड उभारण्यात आले आहे. मात्र अप्रत्यक्ष जबाबदारी मुख्याध्यापक आणि शिक्षकांवरच येऊन पडते. वरकरणी बचत गट दिसत असले तरी शिक्षकांना यामध्ये गुंतून पडावे लागते. सर्वशिक्षा अभियानाने अनेक सकारात्मक बदल झाले आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे शिक्षकांचे कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांच्या पोषणाची जबाबदारी शासनाने शिक्षकांकडे दिली आहे. वरकरणी कल्याणकारी वाटणाऱ्या या योजनेची झळ शिक्षकांना बसत आहे. प्रत्येक शाळेतल्या किमान हजार-दीड हजार मुलांना प्रत्येक दिवशी जेवण देणे, त्या अनुरोधाने तांदूळ, त्याचा हिशेब लिहिणे, खिचडी शिजवून घेणे, वितरण करणे आदी जबाबदारी पार पाडावी लागत आहे.२० मिनिटांच्या मधल्या सुटीत स्वत:चा चहा बाजूला ठेऊन मुलांची खिचडी वाटप करणे, त्यानंतर शाळेत निर्माण झालेल्या भटार खाण्याला टापटीप करणे आदी कामे करावी लागतात. तर काही ठिकाणी खिचडीत काय निघाले अशा तोंडी तक्रारींनाही तोंड द्यावे लागते. जणू ज्ञान मंदिर आता अन्न छत्रालय झाल्याचे दिसत आहे.
शालेय पोषण आहार योजना निश्चितच कल्याणकारी आहे. पण त्यात शाळेला कितपत गुंतविणे योग्य आहे. ग्रामीण भागात ही योजना अतिशय उत्तम परंतु शहरी भागात आपला डबा घरुन घेऊन येणाऱ्यांसाठी ही योजना कुचकामी ठरत आहे. शाळा हे ज्ञानदानाचेच केंद्र असावे तेथे शिक्षणच मिळावे. मात्र सध्या ज्ञानदानासोबत खिचडी वाटपही शिक्षकांना करावी लागत आहे. भविष्यात कल्याणकारी योजनांची खिचडी होऊ नये, एवढे मात्र बघावे. (वार्ताहर)