गुंजच्या मतदार यादीतील घोळ पोहोचला जिल्हाधिकारी कार्यालयात

By Admin | Updated: April 2, 2015 00:02 IST2015-04-02T00:02:14+5:302015-04-02T00:02:14+5:30

तालुक्याच्या गुंज येथील मतदार यादीमध्ये झालेला घोळ बुधवारी थेट यवतमाळ येथील उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्या दरबारात पोहोचला आहे.

Gunj voter list reached the mausoleum in District Collectorate | गुंजच्या मतदार यादीतील घोळ पोहोचला जिल्हाधिकारी कार्यालयात

गुंजच्या मतदार यादीतील घोळ पोहोचला जिल्हाधिकारी कार्यालयात

महागाव : तालुक्याच्या गुंज येथील मतदार यादीमध्ये झालेला घोळ बुधवारी थेट यवतमाळ येथील उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्या दरबारात पोहोचला आहे. फुलझेले यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून गुंजच्या तलाठ्याला स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.
जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतीच्या निवडणुका होवू घातल्या आहेत. त्या अनुषंगाने गावागावात राजकारण सुरू झाले. मतदारांनाही आपले नाव यादीत आहे की नाही, हे तपासण्याची अचानक आठवण झाली. त्यातूनच मतदार यादीतील घोळ पुढे येवू लागले आहेत. याद्या अपडेट करण्याची, त्यातील त्रुट्या दुरुस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मतदार यादीतील घोळाचे गुंज येथील प्रकरण बुधवार, १ एप्रिल रोजी नरेंद्र फुलझेले यांच्या दरबारात पोहोचले. प्रमोद मुकिंदराव जाधव यांच्या नेतृत्त्वात गावकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने फुलझेले यांची भेट घेवून मतदार यादीतील किस्से त्यांना ऐकविले. या यादीत कुटुंबाची विभागणी करण्यात आली आहे. पती एका वॉर्डात, पत्नी दुसऱ्या वॉर्डात तर मुले तिसऱ्याच वॉर्डात आहेत. मुस्लीम मुलगा असताना त्याचा पिता हिंदु दाखविला गेला आहे. मतदार यादीने चक्क जातही बदलविली. असे अनेक घोळ या यादीत आहेत. तलाठ्याने घरी बसूनच या याद्या बनविल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ५ मार्च २०१५ रोजी तलाठ्यांकडे पांडुरंग यादव, विठ्ठल पडोळे, गजानन तळणकर, दत्तराव बागल, गजानन मस्के, प्रमोद जाधव, गजानन पवार यांनी आक्षेप नोंदविला. दुरुस्त्या सुचविल्या गेल्या. मात्र त्यानंतरही या यादीतील चुका दुरुस्त झाल्या नाही. तहसीलदार, एसडीओ स्तरावर न्याय न मिळाल्याने हे गावकरी अखेर फुलझेले यांच्या कार्यालयात पोहोचले.
यादीतील किस्से ऐकून फुलझेले यांनाही धक्का बसला. ते संतप्त झाले. तुम्ही वॉर्ड फॉर्मेशन कसे करता, कोणत्या पद्धतीने नावे घेता, अशा प्रश्नांची सरबत्ती करून फुलझेले यांनी संबंधित तहसील अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले गेले. शिवाय त्या तलाठ्यावर कठोर कारवाईचे सुतोवाच फुलझेले यांनी केले आहे. त्याला स्पष्टीकरण मागण्यात आले. मतदार यादीमुळे गावकऱ्यांचा रोष असल्याने तलाठी गावातच येत नसल्याचे या शिष्टमंडळाने फुलझेले यांना सांगितले.

Web Title: Gunj voter list reached the mausoleum in District Collectorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.