वनातील ग्रीन पार्क रखडला
By Admin | Updated: February 7, 2015 23:32 IST2015-02-07T23:32:08+5:302015-02-07T23:32:08+5:30
तालुक्याला विपुल वनसंपदा लाभली आहे. त्यानुसार तालुक्याला मिळणाऱ्या खनिज विकास निधीतून घुग्गुस मार्गावरील मंदरजवळील निलगिरी वनात ‘ग्रीन पार्क’ उभारण्याचा प्रकल्प

वनातील ग्रीन पार्क रखडला
वणी : तालुक्याला विपुल वनसंपदा लाभली आहे. त्यानुसार तालुक्याला मिळणाऱ्या खनिज विकास निधीतून घुग्गुस मार्गावरील मंदरजवळील निलगिरी वनात ‘ग्रीन पार्क’ उभारण्याचा प्रकल्प तयार करण्यात आला होता़ त्याला १०-१५ वर्षे लोटूनही मूर्त रूप आले नाही. परिणामी आता हे ग्रीन पार्क होणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
तालुक्यात जवळपास १५ भूमिगत आणि खुल्या कोळसा खाणी आहेत. त्यामुळे हा तालुका प्रदूषणात देशात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. शहरासह तालुक्यातील तालुक्यातील जनतेला सकाळ-सायंकाळ शुध्द हवा घेण्यासाठी एखादे उद्यान उपलब्ध नाही. शहरातील उद्याने भकास झाली आहेत. तालुक्यात तर कुठेच उद्यान नाही. शहरातील काही उद्यानांचा आता ‘बांधा, वापरा व हस्तांतरीत करा’ तत्वावर विकास करण्याच्या वल्गना करण्यात येत आहे. काम सुरु झाल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप एकही उद्यान तयार झाले नाही, हीच वास्तविकता आहे.
जवळपास १५ वर्षांपूर्वी शहरात वरोरा रेल्वे गेट व बायपास टी पॉर्इंट, लालपुलिया परिसर येथे खनिज विकास निधीतून तत्कालीन आमदारांनी सौंदर्यीकरण केले होते. त्या सौंदर्यीकरणाचा लाभ वणीकरांना घेताच आला नाही़ योग्य देखभालीअभावी हे सर्व सौंदर्यीकरण क्षणिक ठरले़ तेथील हायमास्ट लाईटही बंद झाले. त्या सौंदर्यीकरणाचा पुरता फज्जा उडाला. अल्पावधीतच ते सौंदर्यीकरण नेस्तनाबूत झाले. चोरट्यांनी साहित्य लंपास केले़ कोलडेपोवाल्यांनी अतिक्रमण करून त्या जागी कोळशाचे ढिगारे रचले़ त्यामुळे कोट्यवधी रूपयांचा खनिज विकास निधी वाया गेला. आता त्या ठिकाणी कधी काळी उद्यान होते, हे ओळखणेही कठीण झाले आहे.
शहर आणि तालुक्यात कुठेही उद्यान नसल्याने मंदरजवळील निलगिरी वनात ‘ग्रीन पार्क’ तयार करण्याचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्याला आता १५ वर्षे लोटली. त्यावेळी ग्रीन पार्कचे स्वरूप, अंदाजपत्रक वन विभागाने तयार करून राज्य शासनाला सादर केले. मात्र पुढे त्याचे काय झाले, हे कुणालाच कळले नाही. अद्याप हे ग्रीन पार्क अस्तित्वातच आले नाही. विशेष म्हणजे हे ठिकाणी वणी शहरापासून केवळ चार किलोमीटर अंतरावर आहे़ त्यामुळे शहरवासीयांना तेथे विरंगुळा घेण्यासाठी जाणे सोपे आहे. बच्चे कंपनीला ते सुटीचा आनदं लुटता आला असता. मात्र पार्कच आता गायब झाला आहे.
या निलगिरी वनात वन विभागाची शेकडो एकर जमीन आहे़ जवळपास एक हजार एकर जमिनीवर हे वन उभे आहे. त्यात रोपवाटीका व काजूची अनेक झाडे आहेत. जवळूनच निर्गुडा नदी वाहाते. त्यामुळे येथे ग्रीन पार्क उभारण्याचा संकल्प वन विभागाने केला होता़ त्यात प्राणी संग्रहालय, विविध मनोरंजक खेळ साहित्य, जंगल परिसरात भ्रमण करणारी मिनी ट्रेन, विसावा कुटी, रंगीत फवारे, विविध फुलांचे बगीचे यांचा समावेश होता़ या सर्वांसाठी त्यावेळी केवळ ३० ते ३५ लाखांचा खर्च अपेक्षित होता. तसे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. विरंगुळ्यासाठी व शुध्द हवा घेण्यासाठी हक्काचे ठिकाण मिळणार म्हणून वणीकर खुश होते. तथापि नियोजनानंतर हा प्रकल्पच बारगळला.
निलगिरी वनात काजूची पूर्वी एक हजार झाडे होती. आता त्यातील बहुतांश झाडे नामशेष झाली आहे. विरळ प्रमाणात काजूची झाडे दिसून येत आहे. अनेक झाडे खूप वर्षांची झाली आहे. त्यापैकी काही झाडे शेवटच्या घटका मोजत आहे. त्यांना जगविण्यासाठी कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही. त्यामुळे या वनातील काजूची झाडे येत्या काही वर्षांत पूर्णत: नामशेष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वनात काजूसह निलगीरी आणि इतर अनेक प्रजातींचे वृक्ष आहेत. मात्र दिवसेंदिवस सर्वच वृक्ष कमी होत आहे. या वनालाच अखेरची घरघर लागली आहे. जवळपास तीन वर्षांपूर्वी या वनात मुलांच्या मनोरंजनासाठी काही साहित्य आले. ते तसेच टाकून देण्यात आले. त्याची व्यवस्थित मांडणी झाली नाही. परिणामी ते साहित्यही बिनकामाचेच ठरले.
या वनाजवळून वणी ते घुग्गुस मार्ग जातो. या मार्गाचे आता चौपदरीकरण होत आहे. त्यामुळे या वनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. रस्ता गुळगुळीत झाल्याने शहरासह तालुक्यातील आबालवृद्धांना तेथे येणे सोपे झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने या वनात ग्रीन पार्क तयार करण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यामुळे नागरिकांना एक चांगले नैसर्गिक सौंदर्यस्थळ उपलब्ध होऊ शकते. (स्थानिक प्रतिनिधी)