ग्रामसेवक संघटनेचे काम बंद आंदोलन
By Admin | Updated: July 1, 2014 01:44 IST2014-07-01T01:44:26+5:302014-07-01T01:44:26+5:30
आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्यावतीने संपूर्ण काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे.

ग्रामसेवक संघटनेचे काम बंद आंदोलन
यवतमाळ : आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्यावतीने संपूर्ण काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे.
या दरम्यान २ जुलैपासून राज्यभरात बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल. या दरम्यान ग्रामपंचायत दप्तर कपाटाच्या चाब्या व शिक्के संबंधित गटविकास अधिकारी यांच्याकडे जमा करण्यात येईल. त्यानंतर विविध तारखांना विभागवार धरणे आंदोलन करण्यात येईल. अमरावती विभागाच्यावतीने ९ व १० जुलैला मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे देण्यात येतील. २६ जुलैपासून राज्य कार्यकारिणी मंडळाचे सर्व सभासद बेमुदत धरणे आंदोलन करतील. अशा प्रकारचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. यापूर्वीसुद्धा ग्रामसेवकांनी आपल्या संघटनेमार्फत विविध मागण्यांसाठी वरिष्ठस्तरावर पाठपुरावा केला. अनेकदा मागण्यांसंदर्भात चर्चा झाल्या. आश्वासने मिळाली. परंतु त्या आश्वासनांची पूर्तता मात्र शासनाकडून करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामीण भागात काम करणाऱ्या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष फोफावला आहे. अखेरीस तीव्र राज्यस्तरीय आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची वेतन त्रूटी दूर करणे, ग्रामपंचायत स्तरावर नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणे, कंत्राटी ग्रामसेवकाचा सेवाकाळ कंत्राटी शिक्षकाप्रमाणे सेवेत लागलेल्या तारखेपासून धरण्यात यावा, २० ग्रामपंचायतींमागे एक विस्तार अधिकारीपद निर्माण करण्यात यावे, प्रवास भत्ता पगारासोबत तीन हजार रुपये करावा, सर्व संवर्गाकरिता बदलीचे धोरण एकच ठेवावे, शासनाच्या चुकीमुळे कंत्राटी ग्रामसेवकांना वेळेवर आदेश न मिळाल्यामुळे पेन्शन योजनेचा लाभ देण्याबाबत सहानुभूतीपूर्वक निर्णय घेण्यात यावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांनी सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन सरचिटणीस आर.आर. जारंडे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)