वणीच्या नगरपरिषद हद्दीत ग्रामपंचायतीची घुसखोरी
By Admin | Updated: January 17, 2015 23:07 IST2015-01-17T23:07:37+5:302015-01-17T23:07:37+5:30
येथील नगरपरिषदेच्या क्षेत्रात लालगुडा ग्रामपंचायतीची ‘ना हरकत’ घेऊन व्यवसाय थाटण्याचा धंंदा राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे नगरपरिषदेचे व शासनाचे नुकसान होत आहे.

वणीच्या नगरपरिषद हद्दीत ग्रामपंचायतीची घुसखोरी
वणी : येथील नगरपरिषदेच्या क्षेत्रात लालगुडा ग्रामपंचायतीची ‘ना हरकत’ घेऊन व्यवसाय थाटण्याचा धंंदा राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे नगरपरिषदेचे व शासनाचे नुकसान होत आहे.
वणी नगरपरिषदेला लागून लालगुडा गावाची हद्द आहे. वणीत नगरपरिषदेची स्थापना ब्रिटिशांच्या काळात सन १९२४ मध्ये झाली. त्यावेळी लालगुडा गावातील काही सर्व्हे नंबर नगरपरिषद हद्दीमध्ये टाकण्यात आले होते. यापैकी सर्व्हे नंबर ३/१ ‘अ’मध्ये गणेश जयस्वाल यांचे देशी दारूचे दुकान, ठाकुरवार यांचे दोन बिअर बार व सिनेमा टॉकीज, तसेच सर्व्हे नंबर ६ मध्ये मदान यांच्या बीअर बारला लालगुडा ग्रामपंचायतीने ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिले आहे. बांधकामांनासुद्धा लालगुडा ग्रामपंचायतीनेच परवानगी दिली आहे.
उपविभागीय अधिकाऱ्यांनी या बीअर बारांना खानावळीची परवानगी दिली तसेच काही घरांच्या बांधकामांना व ले-आऊटमध्ये कूपनलिका खोदण्यासही परवानगी दिली. त्यामुळे नगरपरिषदेचे नुकसान झाले. बीअर बार ग्रामीण क्षेत्रात आल्याने वार्षिक शुल्कसुद्धा शहरापेक्षा कितीतरी कमी भरत आहे. त्यामुळे शासनाचेही मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देणाऱ्या संबंधित ग्रामसेवकांविरुद्ध कारवाई करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी तक्रार नगरसेवक पी.के. टोंगे यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक व दारूबंदी विभागाकडेही तक्रार केली होती. मात्र या विभागांनी त्या तक्रारीची दखलच घेतली नाही. परिणामी खोट्या ‘ना हरकती’वर सुरू झालेल्या बीअर बार व दारूची दुकाने बंद करण्याची मागणी त्यांनी तक्रारीतून केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)