पाणी व गृहकर वसुलीत ग्रामपंचायती माघारल्या
By Admin | Updated: November 16, 2016 00:39 IST2016-11-16T00:39:15+5:302016-11-16T00:39:15+5:30
ग्रामीण जनतेला स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी स्वतंत्र आणि प्रादेशिक नळ योजना निर्माण करण्यात आल्या.

पाणी व गृहकर वसुलीत ग्रामपंचायती माघारल्या
पदाधिकारी सुस्त : गावाच्या विकासावर परिणाम
नेर : ग्रामीण जनतेला स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी स्वतंत्र आणि प्रादेशिक नळ योजना निर्माण करण्यात आल्या. या योजनांचे नियोजन सांभाळणाऱ्या ग्रामपंचायती कर वसुलीत मात्र माघारल्या आहे. त्याचा परिणाम योजनांची देखभाल व दुरुस्तीवर होत आहे.
ग्रामसेवक शासकीय योजनेचा लाभ आणि दाखला देतेवेळी कर भरण्यासंदर्भात बोलतो. परंतु इतरवेळी कर वसुलीसाठी कष्ट उचलताना दिसत नाही. पंचायत समितीचे अधिकारीही या ग्रामसेवकांना कर वसुलीसाठी तंबी देत नसल्याने पाणी कर, गृहकर वसुलीचे प्रमाण अतिशय कमी झालेले आहे.
ग्रामपंचायतीचा मुख्य कणा म्हणून सचिव असतो. मात्र सचिवच मुख्यालयी न राहता शहरातून ये-जा करतात. त्यामुळे नागरिकांना अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते. नागरिकांना सर्व सोयीसुविधा मिळाव्या यासाठी ग्रामपंचायत कटीबद्ध नसल्याचे अनेक बाबीवरून दिसून येते. नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी केंद्र व राज्य शासन अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवितात. या योजना ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित करून त्याची देखभाल करण्याची जबाबदारी सोपविली जाते. याविषयात तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती बेजबाबदार बनल्या आहेत. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी दिले जाणारे ब्लिचिंग पावडरही ग्रामपंचायती नेत नाही. ग्रामपंचायतींनी पाणीपट्टीची आदर्श आकारणी करून नियमित वसूल करण्याची जबाबदारी सचिवांची असते. परंतु सचिवच गावाला दांडी मारत महिन्यात दहा ते पंधरा दिवस गावात जातात. कर वसुलीला ठेंगा ग्रामसचिवच दाखवित आहे. त्यातच पदाधिकारी, गृह व पाणी कर वसुलीसाठी प्रयत्न करीत नाही.
ग्रामपंचायतीने कर वसुली करून उत्पन्न वाढवावे, जेणेकरून गाव विकासाला मदत होईल, अशी भूमिका बजावत नाही. कर वसुलीसाठी ग्रामसेवक आणि पदाधिकारी पुढाकार घेत नसल्याने तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती या बाबतीत पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. (तालुका प्रतिनिधी)