क्लास वनची नोकरी लागली, जातचोरीने गेली; एमपीएससी परीक्षेतील यशावर फेरले पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 07:10 IST2023-12-18T07:10:11+5:302023-12-18T07:10:25+5:30
कठोर अभ्यास करुन एमपीएससी परीक्षेत मिळवलेल्या यशावर जातचोरीने पाणी फेरले.

क्लास वनची नोकरी लागली, जातचोरीने गेली; एमपीएससी परीक्षेतील यशावर फेरले पाणी
- अविनाश साबापुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन एका तरुणाला कृषी उपसंचालक म्हणून नोकरी मिळाली. सोमवारी कृषी विभागाने नवनियुक्त क्लास वन अधिकाऱ्यांची विभाग यादी घोषित केली. पण, अवघ्या दोनच दिवसात म्हणजे १३ डिसेंबर रोजी या तरुणाने जातचोरी केल्याचा प्रकार उघड झाला. त्याचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्यात आले. त्यामुळे कठोर अभ्यास करुन एमपीएससी परीक्षेत मिळवलेल्या यशावर जातचोरीने पाणी फेरले.
दुसऱ्या उमेदवाराचा दावा
ऋषिकेशचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे त्याची नियुक्ती रद्द करून आपल्याला नियुक्ती मिळावी, यासाठी अमित तुमडाम या उमेदवाराने अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांना निवेदन दिले आहे. अमित हा एमपीएससी परीक्षेत ऋषिकेशनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
शाळेतील अभिलेखात केली खाडाखाेड
ऋषिकेश बिभीषण बोधवड असे या तरुणाचे नाव असून, तो बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कृषी विभागातील वर्ग एकची पदे भरण्यासाठी परीक्षा घेण्यात आली. त्यात अनुसूचित जमातीसाठी राखीव जागेवर ऋषिकेश बोधवड याची निवड झाली.
मात्र, याच निवड यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अमित फुलचंद तुमडाम (रा. फुलझरी, ता. रामटेक, जि. नागपूर) या उमेदवाराने बोधवडच्या अनुसूचित जमातीच्या दाव्यावर आक्षेप घेतला आहे. तर आता १३ डिसेंबर रोजी ऋषिकेश बोधवडचा कोळी महादेव जमातीचा दावा औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने अवैध ठरवून त्याचे जात प्रमाणपत्र जप्त केले.
त्याने जेथे शिक्षण घेतले, त्या शाळेतील अभिलेखात जातीच्या रकान्यात पूर्वीची जात खोडून वेगळ्या शाईने व वेगळ्या हस्ताक्षरात ‘म. को.’ ‘म. कोळी’ लिहिल्याची बाब समितीच्या निदर्शनास आली. त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना प्राधिकृत केले आहे.