दारव्ह्यात शिवसेनेला सुवर्णकाळ
By Admin | Updated: March 9, 2017 00:15 IST2017-03-09T00:15:40+5:302017-03-09T00:15:40+5:30
तालुक्यात सध्या शिवसेनेचा सुवर्णकाळ आहे. शिवसैनिकांची प्रचंड मेहनत व जनतेचा वाढणारा पाठिंबा याचे हे फळ आहे.

दारव्ह्यात शिवसेनेला सुवर्णकाळ
संजय राठोड यांचे नेतृत्व : शिवसैनिकांची मेहनत, महत्वाच्या संस्थानवर मारली बाजी
मुकेश इंगोले दारव्हा
तालुक्यात सध्या शिवसेनेचा सुवर्णकाळ आहे. शिवसैनिकांची प्रचंड मेहनत व जनतेचा वाढणारा पाठिंबा याचे हे फळ आहे. परंतु खऱ्या अर्थाने या भागातील राजकीय कार्यक्षेत्रात प्रवेश करून महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी ज्या पद्धतीने पक्षनेतृत्व केले त्याला तोड नाही. त्यांच्यातील नेतृत्व कौशल्यानेच शिवसेनेला मोठी उंची गाठता आली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, नगरपरिषद काही सहकारी संस्था आणि आता जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा सर्वच महत्वाच्या ठिकाणी सेनेने बाजी मारली. काही संस्थांमध्ये विरोधक नावालाही उरले नाही. त्यामुळे शिवसेनेसाठी ऐतिहासिक अस हे यश आहे.
यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना स्थापन करण्याची सुरुवात दारव्हा तालुक्यातून झाली. आता हाच तालुका संपूर्ण जिल्ह्यात पक्षाचे नेतृत्व करीत आहे. याच नेतृत्वाने सेनेला चांगले दिवस दाखविले आहे. त्या काळात शिवसेनेत प्रवेश घ्यायला लोक घाबरायचे. अशा वेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने झपाटलेल्या काही युवकांनी दारव्हा शहरात सेनेची स्थापना केली. त्यानंतर ग्रामीण भागातील काही शाखा तर पोलीस बंदोबस्तात स्थापन कराव्या लागल्या.
शिवसेनेचे पहिले तालुका प्रमुख विनोद डेहणकर (दिवंगत) होते. त्यांनी त्या काळात मोजक्या शिवसैनिकांच्या साथीने हिमतीने पक्ष चालविला. १९८८-८९ च्या काळात तालुक्यात शिवसेना चांगलीच रुजली. याच तालुक्यातून प्रेरणा घेऊन संपूर्ण जिल्ह्यात आणि वाशिम भागात शाखा स्थापन झाल्या.
विधानसभेची पहिली निवडणूक श्रीधर मोहोड यांनी लढली. त्यांचा थोड्या मताने पराभव झाला. त्यानंतर विनोद डेहणकर, दीपक एंबडवार हे विधानसभा निवडणुकीत सेनेकडून लढले. १९९९ मध्ये संजय राठोड यांची दारव्हा तालुक्यात एन्ट्री झाली. त्यांनी मोर्चे-आंदोलनाच्या माध्यमातून प्रखर विरोधकाची भूमिका बजावणे सुरू केले. २०११ मध्ये थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक सेनेने लढविली. त्यात सेना उमेदवाराचा अवघ्या १४० मतांनी पराभव झाला. परंतु २००५ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र दिग्गज माणिकराव ठाकरे यांचा पराभव करीत संजय राठोड सेनेचे पहिले आमदार ठरले. आमदारकीच्या दोन टर्ममध्ये विरोधी पक्षाची भूमिका उत्तमरीत्या बजावली. राज्यात युतीचे सरकार येताच त्यांचा राज्यमंत्री मंडळात समावेश झाला. त्यांच्या नेतृत्वाला आणखीनच झळाळी आली. पालकमंत्रीपद आल्यानंतर जनता दरबारसारखा यशस्वी कार्यक्रम राबविला. याचबरोबर मंत्री म्हणून काम करताना जनतेची नाळ तुटू दिली नाही. मतदारसंघातील विकासात्मक कामे, आरोग्यासारख्या सेवा याच बरोबर तयार केलेली शिवसैनिकांची फळी या भरवशावर शहर व ग्रामीण भागात सेनेने आपला दबदबा निर्माण केला. नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कधी नव्हे एवढे यश मिळाले. आज तालुक्यातील सर्व महत्वाच्या संस्था ताब्यात असून सर्वत्र शिवसेनेचाच बोलबाला आहे.
इतर राजकीय पक्षांना आत्मचिंतनाची गरज
काँग्रेस : सर्वच निवडणुकांप्रमाणे नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत माणिकराव ठाकरे, राहुल ठाकरे यांच्यासह पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यांच्या मेहनतीत खोट नाही, मात्र सध्या जनमत त्यांच्या बाजूने नाही, हे मान्य करावे लागेल. या भागाचे विधानसभेत चार टर्म प्रतिनिधीत्व करणारे आणि पक्षातील राज्यस्तरावरील नेते समजले जाणारे माणिकराव ठाकरे यांचे नेतृत्व, तालुक्यात पक्षाचे मोठे संघटन असताना काँग्रेसला सतत अपयशाचा सामना करावा लागत आहे.
भाजपा : मोदी लाटेमुळे अनेक जण भाजपाकडे आकर्षित झाल्याने या पक्षालासुद्धा तालुक्यातील प्रमुख पक्षांच्या यादीत स्थान मिळाले आहे. नगरपरिषदेत प्रवेश केल्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपाने हवा निर्माण केली. परंतु त्यांना ग्रामीण जनतेने स्वीकारले नाही. नेतृत्व व संघटन अशा दोनही ठिकाणी भाजपा तालुक्यात कमकुवत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस : मागील पंचवार्षिकमधील नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीत चांगले यश मिळविणाऱ्या राष्ट्रवादीला यावेळी मोठा धक्का सहन करावा लागला. पक्षांतराला ऊत आला असताना पक्षाचे नेतृत्व करणारे वसंत घुईखेडकर यांनी डॅमेज कंट्रोल केले. त्यामुळे सध्यातरी जे आहे ते टिकून आहे. परंतु भविष्यातील यशासाठी प्रयत्न आवश्यक आहे.