लाडक्या बहिणींना आणणार सोन्याचे दिवस; एकनाथ शिंदे यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 12:38 IST2025-04-04T12:38:16+5:302025-04-04T12:38:45+5:30

Yavatmal : योजना कायमस्वरूपी चालत राहणार

Golden days will be brought to our beloved sisters; Eknath Shinde's assurance | लाडक्या बहिणींना आणणार सोन्याचे दिवस; एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Golden days will be brought to our beloved sisters; Eknath Shinde's assurance

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :
लाडकी बहीण योजना हे आपले कवच आहे. त्यामुळे ही योजना यापुढे कायमस्वरूपी चालत राहील, अशी ग्वाही देत पंतप्रधान मोदी यांनी लखपती दीदीची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याचप्रमाणे आपणही लाडक्या बहिणींना लखपती बनवून त्यांना सोन्याचे दिवस दाखविणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


येथील समता मैदानावर आयोजित आभार सभेत ते बोलत होते. मंचावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड यांच्यासह शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. विरोधकांनी आम्हाला कस्पटासमान समजून हलक्यात घेतले. मात्र, याच लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी यांच्या जिवावर आम्ही राज्यात सर्वसामान्यांचे सरकार आणले. निवडणुका संपल्या म्हणून या घटकांना आम्ही विसरणार नाही. अडीच कोटी बहिणींचा लाडका भाऊ हे माझ्यासाठी सर्वांत मोठे पद असल्याचे सांगत या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. यावेळी त्यांनी राज्यात राबविलेल्या विविध योजनांचा पाढा वाचला. एक रुपयात पीक विमा, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १६ हजार कोटींची मदत, पोहरादेवी देवस्थानसाठी सव्वा सातशे कोटी तसेच सिंचनासाठी कोट्यवधींचा निधी दिला असून पाच कोटी लोकांना विविध योजनांच्या माध्यमातून थेट मदत दिल्याचे त्यांनी सांगितले.


सर्वसामान्य माणूस हा या सरकारचा केंद्रबिंदू आहे. आम्ही जे बोलतो ते करून दाखवितो, अडीच वर्षे मी मुख्यमंत्री असताना सीएम म्हणजे कॉमन मॅन म्हणून राहिलो, हे नाते या पुढेही कायम राहील, असे सांगत उपस्थितांचे त्यांनी आभार मानले. शिवसैनिकांनाही त्यांनी गाफिल न राहण्याची सूचना केली. विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळविले आहे. यशाची ही परंपरा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांतही कायम राहिली पाहिजे, विकास कामांच्या जोरावर आपण ते करून दाखवू, असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.

Web Title: Golden days will be brought to our beloved sisters; Eknath Shinde's assurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.