वडकीच्या शिक्षक कॉलनीत घरफोडी, रोखेसह सोन्याचे दागिने लंपास
By विलास गावंडे | Updated: March 28, 2023 18:58 IST2023-03-28T18:58:47+5:302023-03-28T18:58:53+5:30
सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल चाेरी

वडकीच्या शिक्षक कॉलनीत घरफोडी, रोखेसह सोन्याचे दागिने लंपास
वडकी (यवतमाळ) : बंद घराचा कुलूप-कोंडा तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने, असा एक लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना वडकी (ता.राळेगाव) येथील शिक्षक कॉलनीत मंगळवारी सकाळी उघडकीस आली. वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खैरी येथे सोमवारी दुपारी महिलेची बॅग लंपास केल्याची घटना ताजी असतानाच रात्री घरफोडी झाल्याने नागरिकात भीती निर्माण झाली आहे.
शिक्षक कॉलनीतील किशोर कारिया यांच्या घरी किरायाने राहणारे महावितरण कंपनीचे वायरमन विशाल दारुंडे यांच्या घरी चोरी झाली. हे कुटुंब घरी नसताना घराचे दार उघडे दिसल्याने पाहणी केली असता चोरीचा प्रकार आढळून आला. तेव्हा नागरिकांनी विशाल दारुंडे याच्याशी भ्रमनध्वनीवर संपर्क केला. वडकी पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी दाखल पोलिसांनी तपासणी केली असता आलमारीचे कुलूप तोडुन त्यातील साहित्य फेकून असल्याचे दिसले.
विशाल दारुंडे नागपूर येथे गेले होते. त्यांनी वडील उदयचंद देवराव दारुंडे यांना वडकी पोलीस ठाण्याला पाठविले. सोन्याच्या तीन अंगठ्या, एक मंगळसूत्र, कानातले, चांदीचे चाळ आणि रोख पाच हजार रुपये, असा एक लाख १३ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरी गेल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली. तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार विजय महाले यांच्या मार्गदर्शनात रमेश मेश्राम, किरण दासरवार करत आहे.