पिके जगविण्यासाठी ग्लासने पाणी
By Admin | Updated: June 25, 2014 00:40 IST2014-06-25T00:40:32+5:302014-06-25T00:40:32+5:30
जोरदार पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे सर्वच सांगतात. मात्र नेमका पाऊस कधी कोसळेल हे कुणीच ठामपणे सांगत नसल्याने शेतकरी धास्तावले आहेत. पीक जगविण्यासाठी शेतकरी आता ग्लासाने

पिके जगविण्यासाठी ग्लासने पाणी
ज्ञानेश्वर मुंदे - यवतमाळ
जोरदार पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे सर्वच सांगतात. मात्र नेमका पाऊस कधी कोसळेल हे कुणीच ठामपणे सांगत नसल्याने शेतकरी धास्तावले आहेत. पीक जगविण्यासाठी शेतकरी आता ग्लासाने पाणी देत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. लांबलेल्या पावसाने पेरण्या तर खोळंबल्याच सोबत वैरण आणि पाणीटंचाईचाही प्रश्न गंभीर होत आहे. आता सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहे.
यवतमाळ जिल्ह्यात लागवड लायक नऊ लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. कृषी विभागाने नऊ लाख ४० हजार हेक्टर लागवडीचे नियोजन केले आहे. मात्र जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे कृषी विभागासोबतच शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. जिल्ह्यात १८ जूनपर्यंत केवळ ३७ हजार हेक्टरवर म्हणजे चार टक्के पेरणी होती. त्यात कपाशी २९ हजार ७८० हेक्टर, सोयाबीन दोन हजार ३४२ हेक्टर, उडीद ११८ हेक्टर, तूर १२०० हेक्टर, मूग १२९ हेक्टर आणि इतर पिकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी जून अखेरीस ७० टक्के पेरण्या झाल्या होत्या. मात्र यावर्षी आतापर्यंत केवळ ५४ मिलिमीटर पाऊस जिल्ह्यात झाला. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहे. १८ जून रोजी जिल्ह्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांनी हिंमत करून पेरणी केली. त्यामुळे लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. ही पेरणी दहा ते १५ टक्के असावी, असा अंदाज आहे. मात्र ही पेरणी आता उलटण्याची भीती निर्माण झाली आहे. लांबलेल्या पावसाने पेरणी तर खोळंबलीच. मात्र वैरण आणि पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत आहे. पैनगंगा, वर्धा, अडाण, अरुणावती, बेंबळा, पूस यासह नदी-नाले कोरडे आहे. नदी तीरावरील नळ योजना अखेरच्या घटका मोजत आहे. वैरण आणि पाण्यासाठी जनावरे कासावीस होत आहे. पेरणीच्या चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना जनावरांच्या वैरण आणि पाण्याचीही सोय लावावी लागत आहे. पावसासाठी आता गावागावात धोंडी काढून वरूण देवतेला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करीत आहे.