साखर उद्योगाला विशेष पॅकेज द्या
By Admin | Updated: March 29, 2015 00:11 IST2015-03-29T00:11:35+5:302015-03-29T00:11:35+5:30
देशात आणि राज्यात गत तीन वर्षांपासून साखर उद्योगाची अत्यंत वाईट अवस्था आहे.

साखर उद्योगाला विशेष पॅकेज द्या
उमरखेड : देशात आणि राज्यात गत तीन वर्षांपासून साखर उद्योगाची अत्यंत वाईट अवस्था आहे. साखर उद्योगाला जिवंत ठेवायचे असेल तर केंद्र सरकारने १६ हजार कोटींचे पॅकेज द्यावे. केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयासमोर शेतकरी कामगार व संचालक ३१ मार्च व १ एप्रिल रोजी लक्षवेध आंदोलन करणार असल्याची माहिती वसंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पाटील देवसरकर यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली.
गत तीन वर्षांच्या कार्यकाळात साखर उद्योग अडचणीत आला आहे. अनेक कारखाने बंद पडले आहे. आतापर्यंत कोणतीही वस्तू तयार झाली असताना निर्माण किमतीपेक्षा कमी दरात विकली जात नाही. साखर निर्मिती करीत असताना कमी दरात विकली जात आहे. ही बाब साखर उद्योगासाठी चिंताजनक आहे. शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस दिला. त्यांचे पेमेंट वेळेत देण्यासाठी हाच मुद्दा महत्त्वाचा समजून तीन हजार प्रतिक्विंटलने निर्माण केलेली साखर २१४५ रुपये अशा पड्या भावाने ४५ हजार क्विंटल साखर बाजारात विकली. २०१३-१४ पर्यंत एफआरपीप्रमाणेच उसाला भाव दिला. परंतु चालू हंगामात निर्माण साखरेपेक्षा कमी दराने साखर विकावी लागत आहे. त्यामुळे एफआरपीएफप्रमाणे १८७८ रुपये ६५ पैसे एवढा भाव कोणताच कारखाना देवू शकत नाही. तेव्हा शासनाने खुशालपणे संचालकाविरुद्ध कारवाई करावी, असे आवाहनही देवसरकर यांनी केले.
एकीकडे शासन उद्योग समूहांना आर्थिक पाठबळ देते. परंतु कृषी प्रधान असलेल्या भारतातील शेतकऱ्यांच्या साखर उद्योगाला अनुदानित आर्थिक पाठबळ का देत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. देशातील तयार केलेली साखर विदेशात निर्यात करावी, जे साखर कारखाने आजारी आहे त्यांचा वेगळा अभ्यासगट तयार करून त्यांना आपत्तीतून बाहेर काढावे, अशी मागणी त्यांनी या पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर लक्षवेध आंदोलन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (शहर प्रतिनिधी)