जिल्ह्यात जलस्रोतांचे जीआयएस मॅपिंग
By Admin | Updated: April 6, 2015 00:13 IST2015-04-06T00:13:31+5:302015-04-06T00:13:31+5:30
जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे. जलस्रोताची संपूर्ण

जिल्ह्यात जलस्रोतांचे जीआयएस मॅपिंग
जीपीएस सयंत्राचा वापर : अक्षांश-रेखांशानुसार स्रोतांचा नकाशा
यवतमाळ : जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे. जलस्रोताची संपूर्ण माहिती आॅनलाईन करण्यासाठी जीआयएस मॅपींगव्दारे नकाशा तयार केला जात आहे. गुगल अर्थवर प्रत्येक जलस्रोताची पाणी गुणवत्तेसह संपूर्ण माहिती अपलोड केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ३२ गावातील स्रोतांचे अक्षांश-रेखांश निश्चित करून माहिती टाकण्यात येईल.
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक गावात जलरक्षक नेमण्यात येणार आहे. जैविक आणि रासायनिक अशा दोन्ही कीटच्या माध्यमातून पाण्याची तपासणी केली जाते. त्याची प्रतवारी सुधारण्यासाठी उपाययोजना करण्यात येते. प्राथमिकस्तरावरच्या तपासणीनंतर जिल्ह्यातील सहा उपविभागीय प्रयोगशाळेत पाण्याचे नमुने तपासण्यात येते. आता या जलस्रोतांची निगराणी ठेवण्यासाठी डिजीटल नकाशा तयार केल्या जात आहे.
गुगल अर्थवर हा नकाशा जीपीएस सयंत्राच्या माध्यमातून अपलोड केला जाणार आहे. ३२ गावातील जलस्रोतांचे जीआयएस मॅपींग करून त्याच्या अक्षांश-रेखांशसह संपूर्ण माहिती गुगल अर्थवर टाकण्यात आली. हे काम सुरूवातीला पाणी गुणवत्ता सल्लागाराकडून करण्यात आले. आता संपूर्ण जिल्ह्यातीलच जलस्रोताचे मॅपींग करण्यासाठी एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. त्यासंदर्भात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपसचिवांनी भूजल सर्वेक्षण विभागातील संचालक आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार जीआयएस मॅपींगचे काम सुरू आहे.
गुगल अर्थवर जलस्रोतातील गुणधर्माची संपूर्ण माहिती राहणार आहे. त्यात जैविक घटकांचे प्रमाण काय, रासायनिक घटक कोणते ही माहिती एका क्लिकवर होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात वेळकाढूपणा आणि पाणी गुणवत्ता सनियंत्रक कार्यक्रमात अधिकाधिक सुस्पष्टता आणण्यात येणार आहे. ग्रामीण भागात दूषीत पाणी पिल्यामुळे दुर्धर आजार बळावले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात अनेक गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाण्याने गंभीर समस्या निर्माण केली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी जीआयएस मॅपींग पद्धतीचा चांगला उपयोग होणार आहे. जिल्ह्यातील जलस्रोताची माहिती तत्काळ मिळणार असून दूषित कोणते, त्यावर उपाययोजना कोणत्या आदीबाबत प्रशासनातील अधिकाऱ्यांना माहिती मिळणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
जलजन्य आजार थांबविण्याचा प्रयत्न
पाणी गुणवत्ता कार्यक्रमाच्या माध्यमातून जलजन्य आजारांचा प्रसार थांबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यात ६० टक्के आजार हे दूषित पाण्यामुळे होतात. ते टाळण्यासाठीच जलस्रोत शुद्धीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठीच जिल्हाभर अभियान राबविले जात आहे.