मुरलीची यात्रा बनली घाटंजी तालुक्याचा लोकोत्सव
By Admin | Updated: February 15, 2016 02:35 IST2016-02-15T02:35:22+5:302016-02-15T02:35:22+5:30
येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरली गावातील श्री सुपूनाथ महाराजांची यात्रा आता आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आयोजनामुळे संपूर्ण तालुक्याचा लोकोत्सव बनली आहे.

मुरलीची यात्रा बनली घाटंजी तालुक्याचा लोकोत्सव
घाटंजी : येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरली गावातील श्री सुपूनाथ महाराजांची यात्रा आता आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आयोजनामुळे संपूर्ण तालुक्याचा लोकोत्सव बनली आहे. रविवारपासून सुरू झालेल्या या यात्रेमध्ये सतत तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे.
सुपूनाथ महाराज मुरली गावाचेच ग्रामदैवत बनले आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात येथे तीन दिवस यात्रा भरते. काही वर्षांपूर्वी छोटे स्वरूप असलेली यात्रा आता वाढत्या लोकसहभागाने लोकोत्सवाचे रूप धारण करीत आहे. कोणताही एक व्यक्ती किंवा संस्था आयोजक नसून संपूर्ण गावकरी या उत्सवाचे आयोजन करतात. दरवर्षी तालुक्यातील भाविक यात्रेसाठी गर्दी करतात.
देवाला आंघोळ घालणे, देव नाचविणे, देवाला राहाडीतून नेणे अशा भाविकांना विस्मयचकीत करणाऱ्या परंपरा या यात्रेमध्ये वर्षानुवर्षे जोपासल्या गेल्या आहे. यात्रेच्या निमित्ताने गाव स्वच्छतेचे तत्त्व जोपासत आहे. यात्रेच्या महिनाभरापूर्वीपासूनच प्रत्येक घर स्वच्छ केले जाते. दिवाळीप्रमाणे घरांची रंगरंगोटी करून घरातील अडगळीतील वस्तू स्वच्छ केल्या जातात. मांसभक्षण या काळात प्रत्येक गावकरी वर्ज्य करतो. या परंपरेमुळे गावकऱ्यांमध्ये एकात्मता आणि निटनेटकेपणाचे तत्त्व रुजले आहे. गावातील दैनंदिन व्यवहारातील किरकोळ वाद विसरून प्रत्येकजण सुपुनाथ महाराजांच्या यात्रेसाठी एकवटतो. मुरली या गावासाठी ही यात्रा दिवाळीपेक्षाही मोठा सण बनलेली आहे. गावातून परगावी गेलेल्या विवाहित मुली यात्रेसाठी आपल्या मुलाबाळांसह दरवर्षी न चुकता येतात. या निमित्ताने गाव तर एकत्र येतोच. पण संपूर्ण गावकऱ्यांचे नातेवाईकसुद्धा एकमेकांशी परिचित होतात. अनेकांच्या विवाहाची बोलणीदेखील या यात्रेच्या निमित्ताने पार पडते. यात्रेमुळे सुपूनाथ महाराजांच्या दर्शनामुळे आपल्या समस्या कमी होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
तीन दिवसांपैकी पहिल्या दिवशी देवाला वाजतगाजत आंघोळ घालण्याची प्रथा आहे. अंघोळीनंतर गावकरी देवाची कावड हाती घेऊन नाचवतात. देवाचे हे नाचणे पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांची प्रचंड गर्दी होते. आपल्या खांद्यावर कावड घेवून नाचणे हा गावकऱ्यांसाठी मोठा सन्मान मानला जातो. देव नाचविण्याचा विधी तीनही दिवस सकाळ-संध्याकाळ पार पाडला जातो. शेवटच्या दिवशी देव राहाडीतून जातो. राहाडी म्हणजे जमिनीवर धगधगते निखारे. या निखाऱ्यांवरून देवाची कावड खांद्यावर घेवून शेकडो गावकरी अनवाणी पायाने चालतात. अशावेळी कोणतीही ईजा होत नाही, असे भाविक सांगतात. त्यानंतर शाट फोडणे ही आगळीवेगळी बाब या यात्रेमध्ये घडते. देवाचे पुजारी हाती मोठा दोर घेऊन नाचतात. हा दोर ज्यांच्या अंगाला लागतो, त्यांचे आजार दूर होतील, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
यात्रेतील या धार्मिक परंपरांपेक्षाही यात्रेच्या निमित्ताने वितरीत केला जाणारा महाप्रसाद हे या यात्रेचे खरे वैशिष्ट्य आहे. बफेची पद्धती सर्वत्र फोफावलेली असतानाही या यात्रेमध्ये हजारो भाविकांना व्यवस्थित पंगतीत बसवून महाप्रसाद दिला जातो. या निमित्ताने गावातील प्रत्येक बोळीमध्ये स्वच्छता करून पंगती बसविल्या जातात. गावातील प्रत्येक तरुण वाढपी, आचारी म्हणून श्रद्धेने राबतो, तर पंगती उठल्यानंतरही स्वच्छतेसाठी प्रत्येकजण झटतो. विशेष म्हणजे बाहेरगावातून आलेले हजारो नागरिक जेवल्याशिवाय मुरली गावातील एकही व्यक्त जेवण करीत नाही. या काळात ठिकठिकाणाहून भाविक येत असल्यामुळे घरोघरी पाहुणे मंडळी असे दृश्य दिसते. (प्रतिनिधी)