आॅनलाईनचे धोके ओळखून संघटित व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 22:12 IST2018-12-02T22:11:26+5:302018-12-02T22:12:11+5:30
आॅनलाईनमुळे सर्व प्रकारच्या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. आॅनलाईनच्या नावाने व्यवसाय थाटून विदेशी कंपन्यांनी भारतात आपले पाय रूजविले आहे. भारत सरकारने या कंपन्यांना १०० टक्के गुंतवणुकीची व्यावसायिक मुभा दिली आहे.

आॅनलाईनचे धोके ओळखून संघटित व्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आॅनलाईनमुळे सर्व प्रकारच्या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. आॅनलाईनच्या नावाने व्यवसाय थाटून विदेशी कंपन्यांनी भारतात आपले पाय रूजविले आहे. भारत सरकारने या कंपन्यांना १०० टक्के गुंतवणुकीची व्यावसायिक मुभा दिली आहे. प्रारंभी स्वत:चे खूप मोठे नुकसान सोसून या कंपन्या भारतातील लहान-मोठ्या व्यापाऱ्यांचे व्यवसाय बंद करण्याच्या तयारीला लागले आहे. विदेशी कंपन्यांमुळे निर्माण झालेल्या व्यावसायिक समस्यांवर येथे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.
जिल्हा इलेक्ट्रॉनिक्स व होम अप्लायन्सेस संघटनेद्वारे आयोजित या शिबिराला जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील व्यापारी आणि विविध कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. संघटनेचे अध्यक्ष नितीन जोशी व व्यावसायिक आलोक जैन यांनी इलेक्ट्रॉनिक कंपन्या आॅनलाईन व्यवसायाला कसे खतपाणी घालत आहे याचे चित्र यावेळी मांडले. डुप्लीकेट व नादुरुस्त माल मिळणे, जुन्या किंवा बंद वस्तू येणे, तक्रारीसाठी चार दिवस फोन न उचलणे आदी प्रकार आॅनलाईन पद्धतीत घडत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या प्रकाराने ग्राहकही त्रस्त झाले असल्याचे ते म्हणाले.
यवतमाळ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष अरुणभाई पोबारू, उपाध्यक्ष राजू निमोदिया, मधुसुदन मुंधडा, महेश करवा यांनीही मार्गदर्शन केले. ८० टक्के व्यवसाय व्यापारी करतात, आॅनलाईनचा व्यवसाय २० टक्क्यांवर पोहोचला आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. व्यापाऱ्यांनी संघटित होऊन आपले व आॅनलाईनमधील रेट समान करण्यास कंपन्यांना भाग पाडावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. संघटनेतर्फे सर्व कंपन्यांना याबाबत ई-मेल पाठविला जाणार असल्याचे यावेळी सांगितले. संचालन राजू जैन यांनी, तर आभार संघटनेचे सचिव निरज शाह यांनी मानले.