उद्यानांचे झाले वाळवंट

By Admin | Updated: June 26, 2014 23:32 IST2014-06-26T23:32:38+5:302014-06-26T23:32:38+5:30

हिरवळीने बहरलेली, मेंदीच्या श्रृंगाराने नटलेले आणि मोगऱ्याचा सुगंध दरवळणारे पुसद शहरातील उद्याने आता वाळवंट झाले आहेत. आता वाळून गेलेली झाडे, तुटलेल्या खुर्च्या, जनावरांचा मुक्तसंचार

Gardens of gardens | उद्यानांचे झाले वाळवंट

उद्यानांचे झाले वाळवंट

कृती आराखड्याचा अभाव : २५ वर्षांपासून उद्यानात वृक्षारोपण नाही
पुसद:हिरवळीने बहरलेली, मेंदीच्या श्रृंगाराने नटलेले आणि मोगऱ्याचा सुगंध दरवळणारे पुसद शहरातील उद्याने आता वाळवंट झाले आहेत. आता वाळून गेलेली झाडे, तुटलेल्या खुर्च्या, जनावरांचा मुक्तसंचार आणि पसरलेली घाण असे दृश्य दिसून येते. बालकांच्या खेळण्याचा आधार, वृद्धांच्या विरंगुळ्याचे ठिकाणच नगरपरिषदेच्या नियोजनशून्यतेने हिरावले आहे. आता शहरात कुठेही विरंगुळ्याचे ठिकाण दिसत नाही.
जुन्या वस्तीतील मोतीनगर, टिळकनगर, तलावलेआऊट आणि नवीन पुसद परिसरात सर्वांग सुंदर उद्याने होती. चार मोठी आणि नवीन वस्त्यांमध्ये पाच उद्यानाच्या खुल्या जागा दृष्टीक्षेपात आहे. गेल्या २५ वर्षात उद्यानाच्या विकासासाठी अनेक तक्रारी झाल्या. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. नगरसेवकांना सांगितले तर बघू-करूची भाषा बोलतात. या उद्यानांमध्ये २५ वर्षात कधी वृक्षारोपणच झालेले नाही. ना फुलझाडे ना लॉन लावण्यात आली. मुलांसाठी खेळणीही चोरीस गेली आहे. केवळ सुरक्षा भिंत बांधणे म्हणजे उद्यानाचा विकास होय का, असा प्रश्न नागरिक करीत आहे.
उन्हाळ्यामध्ये वाळवंट आणि पावसाळ्यामुळे वाढणारे गाजर गवत एवढीच काय ती उद्यानाची व्याख्या झाली आहे. उद्यानाला सुरक्षा भिंत असली तरी असामाजिक तत्वाचा वावर होतो. कधी रात्री-अपरात्री आणि कधी कधी भरदुपारीसुद्धा प्रेमी युगुलांचा संचार असतो. त्यांच्या सोबतीला असतात ती मुक्तपणे हुंदडणारी जनावरे आणि डुकरांचे कळप.
उद्यानाची झालेली दुरावस्था नगर परिषदेला दिसत आहे. परंतु कुणीही त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. लहान बालके मोठ्या आशेने मोडकळीस आलेल्या खेळण्याकडे मोठ्या आशेने पाहतात. वृद्धही बगीच्यात विरंगुळा शोधत असतात. परंतु त्यांच्या पदरी निराशाच पडते.
उद्यानात फुलझाडे, मुबलक पाणी, मुलांची खेळणी, सिमेंट बाकडे, पथदिवे, चौकीदार, सुरक्षा भिंत पुरविणे गरजेचे आहे. परंतु २५ वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या या उद्यानाच्या विकासाकडे कुणीही पाहत नाही.
नगर परिषदेकडून हे शक्य नसेल तर स्वयंसेवी संस्थेला देण्याची गरज आहे. सध्या उद्यानाच्या नावावर असलेल्या खुल्या जागांना अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. यामुळे दिवसेंदिवस उद्यानाचे सौंदर्य नष्ट होताना दिसत आहे. (वार्ताहर)

Web Title: Gardens of gardens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.