दरोड्याच्या प्रयत्नातील नागपूरची टोळी गजाआड
By Admin | Updated: November 29, 2014 23:27 IST2014-11-29T23:27:46+5:302014-11-29T23:27:46+5:30
अलिशान स्कॉर्पिओ वाहनाव्दारे घातक शस्त्र बाळगून दरोड्याच्या बेतात असलेल्या नागपूर येथील एका गुन्हेगारी टोळीला पोलिसांनी शिताफीने अटक केली. तसेच वाहन आणि घातक शस्त्र जप्त केले.

दरोड्याच्या प्रयत्नातील नागपूरची टोळी गजाआड
चिचबर्डीत कारवाई : स्कॉर्पिओ, घातक शस्त्रासह पाच जणांना अटक
ंयवतमाळ : अलिशान स्कॉर्पिओ वाहनाव्दारे घातक शस्त्र बाळगून दरोड्याच्या बेतात असलेल्या नागपूर येथील एका गुन्हेगारी टोळीला पोलिसांनी शिताफीने अटक केली. तसेच वाहन आणि घातक शस्त्र जप्त केले. ही कारवाई शुक्रवारी रात्री येथील अमरावती मार्गावरील चिचबर्डी शिवारातील वाघाई मंदिराजवळ करण्यात आली.
राकेश मोहन गाडेकर (२७), हरदीप प्रताप टाक (३०), विनय सुनील नारनवरे (२९), संतोष अशोक मडावी (३४), राकेश बाबू बैरीलाल (३१) सर्व रा. नागपूर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांच्या शिरावर नागपूर येथील विविध पोलीस ठाण्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले. नागपूर येथून स्कॉर्पिओ (क्र. एमएच ४० एसी ९१९१) वाहनाव्दारे आलेली एक टोळी नेर येथे दरोड्याच्या घटनेला मूर्तरूप देण्यासाठी जात असल्याची गोपनीय माहिती येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल मदने यांना मिळाली होती. त्यावरून फौजदार वसंत मडावी, एएसआय अजय ढोले, विजय जाधव, प्रमोद मडावी, संतोष मडावी, इक्बाल शेख आदींचा समावेश असलेल्या पथकाने चिचबर्डी शिवारातील वाघाई मंदिराजवळ सापळा रचला. वाहन येताच ते शिताफीने थांबवून पाचही जणांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी वाहनाची झडती घेतली असता धारदार तलवार, चाकू, मिरची पुड आदी साहित्य आढळून आले. हे साहित्य जप्त करून पोलिसांनी संबंधित पाचही जणांना अटक केली. त्यांच्या विरुद्घ यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंवि ३९९ आणि शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याच्या ४ (२५) कलमान्वये दरोड्याचा प्रयत्न आणि घातक शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या पाचही आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी यवतमाळ येथे एका व्यक्तीकडे कार्यक्रमासाठी आलो होतो. तेथून नेर येथे दरोड्याच्या घटनेला मूर्तरूप देण्यासाठी जात असल्याची कबुली दिल्याचे पोलिसातून सांगण्यात आले. तसेच तो यवतमाळातील व्यक्ती एका गंभीर प्रतिबंधात्मक कारवाईत अमरावती कारागृहात होता. त्याचवेळी त्याच्याशी या टोळीचा म्होरक्या राकेश गाडेकर याच्याशी मैत्री झाल्याचेही त्यांनी पोलिसांपुढे उघड केल्याचे सांगण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)