जहाल नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडेवर यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 19:44 IST2021-11-15T19:43:28+5:302021-11-15T19:44:04+5:30
Yawatmal News गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांच्या चकमकीत मरदीनटोला पहाडी क्षेत्रात ठार झालेला जहाल नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे याच्यावर सोमवारी सायंकाळी वणीलगतच्या लालगुडा परिसरातील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जहाल नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडेवर यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे अंत्यसंस्कार
यवतमाळ : गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांच्या चकमकीत मरदीनटोला पहाडी क्षेत्रात ठार झालेला जहाल नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे याच्यावर सोमवारी सायंकाळी वणीलगतच्या लालगुडा परिसरातील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार व ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या नेतृत्वात वणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
सोमवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास मिलिंद तेलतुंबडे याचा मृतदेह गडचिरोली येथील पोलिसांच्या चोख बंदोबस्तात वणीत आणण्यात आला. यावेळी गडचिरोली येथून पीएसआय बिरादर यांच्या नेतृत्वात कमांडोच्या तीन तुकड्या वणीपर्यंत सोबत होत्या. मिलिंद तेलतुुंबडे याचा पुतण्या ॲड.विप्लव तेलतुंबडे यांच्या लालगुडा परिसरातील घरी मृतदेह पोहोचल्यानंतर नातलगांनी तेथे अंत्यदर्शन घेतले. या ठिकाणी बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर, अंत्ययात्रा काढण्यात आली.
लालगुडा परिसरातील स्मशानभूमीत मिलिंद तेलतुंबडे याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याची आई अनुसया तेलतुंबडे, पत्नी अंजला, बहिणी विशाखा, नंदिनी, सुशीला, भाऊ किशोर तेलतुंबडे, विलास तेलतुंबडे यांच्यासह २०० पेक्षा अधिक नातलग उपस्थित होते. यावेळी मिलिंद तेलतुंबडे याच्या चितेला पत्नी अंजला व पुतण्या ॲड.विप्लव तेलतुंबडे यांनी अग्नी दिला.