पाणीपुरवठा योजनेच्या कामांसाठी ११ कोटींचा निधी मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 18:39 IST2025-01-20T18:37:47+5:302025-01-20T18:39:20+5:30
Yavatmal : १२ तालुक्यांचा आहे समावेश; जलजीवन मिशन कार्यक्रमात सुधारित मान्यता

Fund of Rs 11 crore approved for water supply scheme works
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागामार्फत जलजीवन मिशन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ११ तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींमध्ये शुद्ध व सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी नळ योजना प्रस्तावित करण्यात आली. याचे प्रस्तावही तयार झाले. वाढत्या महागाईमुळे त्याच्या किमतीत वाढ झाली. यासाठी सुधारित प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी शासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडे गेले. येथे दहा कोटी ६९ लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी मिळाली आहे.
जीएसटीसह तांत्रिक मान्यतेचा प्रस्ताव
येथील पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी सुधारित मान्यतेचा प्रस्ताव देण्यात आला होता. स्थानिक पंचायत समितीकडून गावात नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी तेथील आवश्यकतेनुसार पाईपलाईन, मोटारपंप, पाण्याची टाकी, आवश्यकता असेल तेथे विहीर, विजेची जोडणी अशा विविध उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्याचा प्रस्ताव सुधारित मान्यतेसाठी देण्यात आला. त्यामध्ये जीएसटीसह आर्थिक तरतूद करण्यात आली. कक्षाधिकारी वनिता जाधव यांच्या स्वाक्षरीने मंजुरी आदेश आहे.
योजनेच्या कामाला मिळणार गती
दहा कोटी ६९ लाख रुपयांच्या नळ योजनेच्या कामाला गती मिळणार आहे. बहुतांश दुर्गम भागातील गावांमध्ये पाणीपुरवठ्याची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. सुधारित तांत्रिक मान्यतेसाठी ही कामे रखडली होती. आता त्याला मान्यता मिळाल्याने उन्हाळ्यापूर्वी या योजनांची कामे पूर्ण करून गावात शुद्ध पाणी कसे मिळेल याचे नियोजन जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून केले जात आहे.
२८ ग्रामपंचायतीमध्ये केली जाणार नळाची सुविधा
सुधारित प्रस्तावाला मान्यता घेण्यासाठी जिल्हा परिषदेने शासनाकडे पाठपुरावा केला. त्यातून हा निधी आला आहे.
अशी आहेत नव्या योजनेतील गावे
- १६ तालुक्यांपैकी सुधारित कार्यक्रमांतर्गत उमरखेड, मारेगाव, कळंब, महागाव, वणी, घाटंजी, पुसद, दिग्रस, आर्णी, झरी, दारव्हा या तालुक्यांचा समावेश केला आहे.
- उमरखेडमध्ये अनंतवाडी, कोपरा खु., महागावमध्ये आमनी, वसंतनगर, साधूनगर, वागनाथ, पुसदमध्ये पिंपरवाडी, दिग्रसमध्ये वसंतनगर, फेट्री, आर्णी येथे चिकणी कसबा, दारव्हा तालुक्यात मानकोपरा, मारेगावमध्ये अर्जुनी, गोरज, जळका.
- घाटंजीत पोरकुंड, दत्तापूर, वणीमध्ये आमलोण, पाथरी, धोपटाळा, सोमनाळा, कळंबमध्ये आंधबोरी, पिंपळखुटी, झरीमध्ये बोटोणी, बिरसापेठ, मूळगव्हाण, रायपूर, वाढोणा बंदी या ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती.