७ मेपासून बारा वाजताच गायब होणार आपली सावली !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 12:48 IST2025-04-29T12:47:32+5:302025-04-29T12:48:11+5:30
सावली पायातच राहणार : ७ मेपासून वेगवेगळ्या ठिकाणी येणार अनुभव

From May 7th, our shadow will disappear at 12 o'clock!
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सूर्य अगदी ९० अंशाच्या कोनात डोक्यावर येणार असल्याने ७मेपासून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या तारखेला दुपारी १२:०० वाजता सावली गायब होण्याचा अनुभव घेता येणार आहे. कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दोन रेषांच्या मधल्या पट्टयातच सूर्यकिरणे क्रमाक्रमाने लंबरूप पडतात. त्यामुळे या भागातूनच वर्षातून दोनदा (सूर्य एकदा उत्तरेकडे सरकताना व एकदा दक्षिणेकडे सरकताना) शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. आपली सावली आपल्या पायातच राहील, तर सरळ उभ्या वस्तूची सावलीच दिसणार नाही.
कर्कवृत्ताच्या उत्तरेकडे आणि मकर वृत्ताच्या दक्षिणेकडे सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. त्यामुळे तेथे नेहमी तिरपी सावली पडते. पृथ्वीचा अक्ष जर सरळ ९० अंशात असता तर फक्त विषुववृत्तावरच नेहमीसाठी शून्य सावली अनुभवता आली असती. सूर्य दररोज ०.५० अंशच सरकतो, म्हणून तो एकाच अंशावर दोन दिवस राहतो. एका अक्षांशावर येणाऱ्या सर्व परिसरात एकाच वेळी शून्य सावलीचा अनुभव येतो.
...असा घेता येईल अनुभव
- वस्तू समांतर पृष्ठभागावर एखादा दंडगोल, पेन्सिल अथवा तत्सम वस्तू अगदी सरळ उभी ठेवून शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे.
- ज्या ठिकाणासाठी जी तारीख असेल त्या दिवशी हा प्रयोग करून अनुभव घेता येईल, असे स्काय वॉच ग्रुप, यवतमाळचे अध्यक्ष रवींद्र खराबे यांनी सांगितले.
- शून्य सावलीचा अनुभव घ्यावा, असे आवाहन रवींद्र खराबे यांच्यासह प्रमोद जिरापुरे, उमेश शेंबाडे, भूषण ब्राह्मणे, जयंत कर्णिक, पूजा रेकलवार, मानसी फेंडर आदींनी केले आहे.
कोणत्या दिवशी कोणत्या जिल्ह्यात
७ मे - कोल्हापूर, मिरज, सांगली, १० मे- सातारा, अक्कलकोट, ११ मे -वाई, महाबळेश्वर, १२ मे बार्शी, बारामती, १३ मे लातूर, १४ मे अलिबाग, दौंड, पुणे, १५ मे - मुंबई, १६ मे - नगर, कल्याण, नांदेड, ठाणे, १८ मे पैठण, १९ में जालना, २० मे - संभाजीनगर, नाशिक, २१ मे -मनमाड, २२ मे यवतमाळ, २३ मे-बुलढाणा, मालेगाव, २४ मे अकोला, २५ मे अमरावती, २६ मे-भुसावळ, जळगाव आणि नागपूर येथे शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे. या ठिकाणी दुपारी १२:०० वाजता सूर्य अगदी डोक्यावर येईल