वणी वनपरिक्षेत्रातील कृत्रीम पाणवठ्यांत पाण्याचा ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:00 IST2020-05-03T05:00:00+5:302020-05-03T05:00:31+5:30
वणी वनपरिक्षेत्रात नवीन पाणवठ्यांसाठी वनविभागाच्यावतीने दोनवेळा वरिष्ठांकडे निधीची मागणी करण्यात आली. मात्र अद्यापही त्याची पूर्तता झाली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निधी मिळेल की नाही, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. वणी वनपरिक्षेत्रात ३० कृत्रीम पाणवठे आहेत. यापैकी केवळ पाच ते सहा पाणवठ्यात आठ ते १० दिवस पुरेल इतके पाणी शिल्लक आहे. त्यानंतर तीव्र उन्हामुळे हे पाणवठेदेखील आटण्याची शक्यता आहे.

वणी वनपरिक्षेत्रातील कृत्रीम पाणवठ्यांत पाण्याचा ठणठणाट
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वणी : जंगलात भटकणाऱ्या वन्यप्राण्यांची तहान भागावी, यासाठी वनविभागाने तयार केलेल्या पाणवठ्यांमध्ये ठणठणाट असून त्यामुळे आता या वन्यजीवांना नदी किंवा नैसर्गीक नाल्यातून वाहणाऱ्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. सध्यातरी मानव-वन्यजीवांच्या संघर्षाची या परिसरात घटना घडली नसली तरी भविष्यात अशी घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वणी वनपरिक्षेत्रात नवीन पाणवठ्यांसाठी वनविभागाच्यावतीने दोनवेळा वरिष्ठांकडे निधीची मागणी करण्यात आली. मात्र अद्यापही त्याची पूर्तता झाली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निधी मिळेल की नाही, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. वणी वनपरिक्षेत्रात ३० कृत्रीम पाणवठे आहेत. यापैकी केवळ पाच ते सहा पाणवठ्यात आठ ते १० दिवस पुरेल इतके पाणी शिल्लक आहे. त्यानंतर तीव्र उन्हामुळे हे पाणवठेदेखील आटण्याची शक्यता आहे. नाही म्हणायला अधुनमधून हजेरी लावणाºया अवकाळी पावसामुळे या पाणवठ्यांमध्ये काही प्रमाणात पाणी साचते. परंतु नंतर तेही आटून जाते. त्यामुळे वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. पाण्याच्या शोधात वन्यजीव लोकवस्त्यांकडे धाव घेण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
वणी वनपरिक्षेत्रात वाघ, हरिण, रोही, सांबर, रानडुक्कर, मोर, निलगाय, यासह अनेक वन्यजीव मोठ्या संख्येने आहेत. त्यांची जंगलातच तहान भागावी म्हणून वनविभागाच्यावतीन पाणवठे तयार करण्यात आले. परंतु हे पाणवठे कोरडे पडल्याने या वन्यजीवांना आपली तहान भागविण्यासाठी नदीकडे धाव घ्यावी लागत आहे. वणी वनपरिक्षेत्रातून वर्धा, पैनगंगा, निर्गुडा, विदर्भा यासह नांदेपेराजवळून एक मोठा नालाही वाहतो. या जलस्त्रोतातूनच वन्यजीव सध्यातरी आपली तहान भागवित असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.
मोर, रानडुकरांच्या शिकारी वाढल्या
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. त्यामुळे जंगलातून जाणारे रस्तेही निर्मनुष्य आहे. परिणामी वन्यजीव मुक्तपणे भटकंती करताना दिसत आहे. यातच काही शौकीनांकडून मोर व रानडुकरांच्या मोठ्या प्रमाणावर शिकारी केल्या जात असल्याची चर्चा ग्रामीण भागात आहे.