चार वर्षांपासून घरकुलाच्या हप्त्याची प्रतीक्षा कायमच
By Admin | Updated: July 1, 2014 01:43 IST2014-07-01T01:43:00+5:302014-07-01T01:43:00+5:30
घरकुलाच्या लाभार्थ्याला चक्क चार वर्षांपासून दुसऱ्या हप्त्याचा लाभच मिळालेला नाही. हा धक्कादायक प्रकार जिल्हा परिषदेच्या जनता दरबारात उघडकीस आला. नेर तालुक्यातील टाकळी सलाम येथील

चार वर्षांपासून घरकुलाच्या हप्त्याची प्रतीक्षा कायमच
यवतमाळ : घरकुलाच्या लाभार्थ्याला चक्क चार वर्षांपासून दुसऱ्या हप्त्याचा लाभच मिळालेला नाही. हा धक्कादायक प्रकार जिल्हा परिषदेच्या जनता दरबारात उघडकीस आला. नेर तालुक्यातील टाकळी सलाम येथील मधुकर हरसिंग राठोड या लाभार्थ्याने आपली व्यथा मांडली.
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात योजनांपासून वंचित राहिलेल्या अनेक ग्रामस्थांनी तक्रारी केल्या. सोमवारी झालेल्या दरबारात तेरा जणांनी तक्रारी केल्या तर यापूर्वीच्या दरबारात आलेल्या सोळा तक्रारींच्या निपटाऱ्यांचा आढावा घेण्यात आला.
टाकळी सलाम येथील तांड्यावर अतिक्रमित जागेतच घरकुलाची योजना राबविण्यात आली आहे. २००९ मध्ये लाभार्थी यादित नाव असलेल्या इतरांची घरे पूर्ण झाली आहे. मात्र केवळ मधुकरच्या घराच्या पायव्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अतिक्रमित जागेचा मुद्दा उपस्थित केला. पहिल्या हप्त्यातील १५ हजार रुपये खर्च करून हे बांधकाम केले. शिवाय राहते घर मोडून घरकुलाचे काम सुरू केले. मात्र त्यानंतर दुसरा हप्ता मिळालाच नाही. गेल्या चार वर्षांपासून घरकुलाच्या हप्त्याची प्रतिक्षा मधुकर राठोड करीत आहे. त्याने चक्क पंचायत समिती कार्यालयात असलेली मूळ फाईलच अध्यक्षांच्या पुढे ठेवली. या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन निपटारा करण्याचे निर्देश अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी दिले. यानंतर अंतरगाव रस्त्याच्या कामातील तक्रारीची चौकशी ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकाऱ्याने करावी, असे आदेश दिले. आर्णी तालुक्यातील तळणी शाळेत बांधकामाचे सहा खड्डे खोदून ठेवले आहे. शाळा सुरू झाल्याने या खड्डयांमध्ये पडून विद्यार्थी जखमी होतात, हे खड्डे तातडीने बुजवावे अथवा काम पूर्ण करावे, अशी तक्रार येथील पालकांनी केली आहे. याची दखल घेऊन गटशिक्षण अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. आर्णी तालुक्यातीलच तळणी येथे २००५ मध्ये सात हजार रुपये देऊनही ग्रामसेवक जागेचा आठ अ देण्यास टाळाटाळ करीत होता. याबाबत तक्रार करण्यात आली. या प्रकरणाचीही चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे. यावेळी सभापती प्रभाकर उईके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुळकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मोडक व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)