सीसीआयपेक्षा खासगी व्यापाऱ्यांची चौपट खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:00 IST2020-05-28T05:00:00+5:302020-05-28T05:00:31+5:30
शेतकऱ्यांचा कापूस कमी दरात खरेदी करून तो सीसीआय व पणनला विकण्याचा फंडा नेहमीप्रमाणेच यंदाही व्यापाऱ्यांनी राबविला. शेतकरी प्रयत्न करूनही सीसीआय केंद्रावर आपला कापूस विकू शकले नाही. हजारो रुपयांची तूट येत असतानाही नाईलाजास्तव शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागला. या सर्व व्यवहारात जिल्ह्यासह इतर तालुक्यातील व लगतच्या जिल्ह्यातील व्यापारी व दलालांनी चांगलाच नफा कमावला.

सीसीआयपेक्षा खासगी व्यापाऱ्यांची चौपट खरेदी
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : हमी भावात कापूस विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करून सीसीआय केंद्रावर जावे लागते. सीसीआयने कापूस खरेदीची गती मंद ठेवल्याने नाईलाजास्तव शेतकऱ्यांना कमी भावात व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागला. त्यामुळेच राळेगावमध्ये सीसीआय व पणन महासंघापेक्षा खासगी व्यापाऱ्यांनी चौपट कापसाची खरेदी केली.
शेतकऱ्यांचा कापूस कमी दरात खरेदी करून तो सीसीआय व पणनला विकण्याचा फंडा नेहमीप्रमाणेच यंदाही व्यापाऱ्यांनी राबविला. शेतकरी प्रयत्न करूनही सीसीआय केंद्रावर आपला कापूस विकू शकले नाही. हजारो रुपयांची तूट येत असतानाही नाईलाजास्तव शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागला. या सर्व व्यवहारात जिल्ह्यासह इतर तालुक्यातील व लगतच्या जिल्ह्यातील व्यापारी व दलालांनी चांगलाच नफा कमावला. अल्पभूधारक व सर्वसाधारण शेतकरी अजूनही कापूस कसा विकावा, या विवंचनेत आहे. राळेगाव, वाढोणाबाजार, खैरी येथे एकाच जिनिंगमध्ये कापूस खरेदी केला जात आहे. तेथे जास्त स्टॉक ठेवण्यात येऊ नये असा आदेश सीसीआयच्या अकोला मुख्यालयातून आला आहे. जिनिंगमध्ये वाढत्या तापमानात दिवसा जिनिंग केल्या जात नाही. केवळ एका पाळीतच जिनिंग होते. यामुळे आग लागण्याच्या भीतीच्या दडपणामुळे कापूस खरेदीला मर्यादा आल्या आहे. काही जिनिंगमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना, पाणी याची कमतरता आहे. कोरोनामुळे झालेले लॉकडाऊन, जिल्हाबंदी या विविध कारणांनी शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहे. कापसासह सोयाबीन, तूर, चना या धान्य विक्रीतही शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचे म्हणविल्या गेलेल्या स्थानिक दोन प्रतिनिधींनी निवेदन देणे व फोटोसेशन करणे यापुढे जावून काहीच केलेले नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी अडचणीत आहे.
जिल्हाबंदी असतानाही परजिल्ह्यातील वाहने केंद्रावर
राळेगावमध्ये वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यातूनही कापसाची वाहने आली. मिनीट्रकसारख्या वाहनाने आलेला कापूसही मोजण्यात आला. जिल्हाबंदी असतानाही एम.एच.३४, एम.एच.३२ सिरिजचे वाहन राळेगाव कापूस केंद्रावर पोहोचले कसे याचा शोध घेण्याची गरज आहे.