करंजीच्या कोंबडबाजारात चार लाखांची उलाढाल

By Admin | Updated: December 29, 2014 02:11 IST2014-12-29T02:11:23+5:302014-12-29T02:11:23+5:30

करंजी ते मारेगाव मार्गावरील एका जंगलात अवघ्या काही तासात किमान चार लाख रुपयांची उलाढाल होणारा कोंबडबाजार चालविला जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

Four lakh turnover in Karanji's hen market | करंजीच्या कोंबडबाजारात चार लाखांची उलाढाल

करंजीच्या कोंबडबाजारात चार लाखांची उलाढाल

प्रवीण पिन्नमवार पांढरकवडा
करंजी ते मारेगाव मार्गावरील एका जंगलात अवघ्या काही तासात किमान चार लाख रुपयांची उलाढाल होणारा कोंबडबाजार चालविला जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
करंजी परिसरातीलच तिघांनी एकत्र येऊन हा कोंबडबाजार भरविणे सुरू केले. त्यासाठी पांढरकवडा येथील पोलिसांची एनओसी (नाहरकत) घेऊन त्यासाठी डिलींगही झाल्याची चर्चा आहे. करंजी रोडवर एका फॅक्ट्रीपासून आत जाणाऱ्या मार्गावर सुमारे एक किलोमीटरनंतर सुरू होणाऱ्या जंगलात हा कोंबडबाजार चालविला जात आहे. अलीकडेच सुरू झालेल्या या कोंबडबाजाराचे रविवार, बुधवार व शुक्रवार हे दिवस ठरलेले आहेत. सदर प्रतिनिधीने या कोंबडबाजाराला रविवारी दुपारी २ वाजता प्रत्यक्ष भेट दिली असता तेथील चित्र धक्कादायक होते.
या कोंबडबाजारावर सुमारे एक हजार २०० शौकिनांची उपस्थिती होती. त्यात सामान्यांसोबतच श्रीमंत व प्रतिष्ठितांचाही समावेश होता. कुणी दुचाकीने तर कुणी चारचाकी वाहनाने आले होते. कोंबडबाजारापासून काही दूर अंतरावर ही वाहने लावली गेली होती. त्यात बोलेरोसारख्या महागड्या गाड्याही दृष्टीस पडल्या. तर प्रवासी वाहतूक करणारे काळी-पिवळी टॅक्सीची संख्याही बरीच होती. या टॅक्सीने काही लोक खेळण्यासाठी आले होते. कोंबडबाजारात कुणी अनोळखी व्यक्ती येतो का यावर नजर ठेवण्यासाठी खास सहा ते आठ टपोरी लोक नेमले गेले होते. त्यांच्या नजरा येणाऱ्यांमध्ये ओळख शोधत होत्या. गोल दोर बांधून त्या आत कोंबडांची झुंज सुरू होती.
आणखी १० ते १२ कोंबड झुंजीसाठी तयार केले जात होते. त्यावर पैसेही स्वीकारले जात होते. याच परिसरात चार कॉर्नरला चेंगळ, तितलीभवरा सुरू होता. तेथेही शौकिनांची बरीच गर्दी होती. कोंबडबाजाराच्या ठिकाणी देशी दारूची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती. देशी दारु कॅनमध्ये ठेवली गेली होती. दुपारी १२ वाजता सुरू होणारा हा कोंबडबाजार सायंकाळी ४ ते ५ पर्यंत चालतो. दुपारी २ नंतर हा कोंबडबाजार रंगात येतो.
सदर प्रतिनिधीने प्रातिनिधिक स्वरूपात नव्यानेच सुरू झालेल्या करंजी जंगलातील कोंबडबाजाराला भेट देऊन तेथील वास्तव उघड केले. मात्र पांढरकवडा व वणी विभागात असे डझनावर कोंबडबाजार राजरोसपणे सुरू आहेत. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल केली जात आहे. या उलाढालीमध्ये खाकी वर्दीतील अनेक लाभार्थी असून, या लाभाचे ‘पाट’ यवतमाळ, अमरावतीपर्यंत वाहत असल्याचे पोलीस वर्तुळात बोलले जाते.
करंजीसह पांढरकवडा, वणी विभागातील कोंबडबाजार, दारू, जुगार अड्डे, मटका पोलिसांसाठी आव्हान ठरला आहे.

Web Title: Four lakh turnover in Karanji's hen market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.