बुडीत क्षेत्रातील चाऱ्याचा पशुधनाला आधार
By Admin | Updated: January 24, 2015 01:56 IST2015-01-24T01:56:42+5:302015-01-24T01:56:42+5:30
जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीमुळे चारा टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. पशुधनाला वाचविण्यासाठी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात चाऱ्याची लागवड केली जाणार आहे.

बुडीत क्षेत्रातील चाऱ्याचा पशुधनाला आधार
लोकमत विशेष
यवतमाळ : जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीमुळे चारा टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. पशुधनाला वाचविण्यासाठी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात चाऱ्याची लागवड केली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. पशुधनासाठी ३ लाख ४२ हजार मेट्रिक टन चाऱ्याची आवश्यकता भासणार आहे. ही तूट भरून काढण्यासाठी अभिनव प्रयोग जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे.
शेतकऱ्यांना विविध योजनेतून १०० टक्के अनुदानावर चारा बियाणे उपलब्ध करून देण्यात येते. मात्र याचे आजपर्यंत योग्य पद्धतीने नियोजन करण्यात आले नाही. यावर्षी तर पावसाने दडी मारल्यामुळे चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण होणार आहे. आॅगस्ट ते जुलै या पद्धतीने चाऱ्याचे नियोजन केले जाते. यावर्षी पेरेपत्रकावरच्या पिकातून १९ लाख २३ हजार मेट्रिक टन चाऱ्याचे उत्पादन झाले. यातील ११ लाख २० हजार मेट्रिक टन चारा जानेवारी अखेरपर्यंत संपणार आहे. उर्वरित सहा महिन्यासाठी केवळ ८ लाख ३ हजार मेट्रिक टन चारा शिल्लक आहे. यातून दुधाळ जनावराचे संगोपन करणे शक्य होणार नाही. आज जिल्ह्यात ८९ हजार दुधाळ जनावरे आहेत. त्यांना किमान दीड लाख मेट्रिक टन हिरवा चारा लागणार आहे. शिवाय उर्वरित जनावरांच्या पोषणाचा प्रश्न कायम आहे. यावरच उपाय म्हणून जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिलीप सोनकुसळे यांनी अभिनव योजना आखली. यात थोडा बदल करून जिल्हाधिकारी राहुलरंजन महिवाल यांनी त्याला मान्यता दिली आहे.
चारा उत्पादनासाठी तालुक्यांच्या स्तरावर समिती स्थापन केली आहे. यामध्ये अध्यक्ष म्हणून तहसीलदार, सचिव पशुधन विकास अधिकारी, सदस्य तालुका कृषी अधिकारी आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी राहणार आहेत. कृषी विभागाकडून सात हेक्टरवर आणि पशुसंवर्धन विभागाने पाच हजार हेक्टरवर चारा लागवडीचे नियोजन केले आहे. यातून किमान ३ लाख ७५ हजार मेट्रिक टन हिरवा चारा मिळणार आहे. जुन-जुलै महिन्यात उद्भवणाऱ्या चारा टंचाईचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून आताच केले जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)