गोळीबारातील ‘बुलेट’वर तपास केंद्रित
By Admin | Updated: January 1, 2015 23:08 IST2015-01-01T23:08:50+5:302015-01-01T23:08:50+5:30
बीअरबारमधील गोळीबार प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असून हॉटेल व्यवस्थापक आणि त्या टाईल्स् व्यावसायिकाला चौकशीसाठी पाचारण केले. मात्र हा व्यावसायिक भूमिगत झाला

गोळीबारातील ‘बुलेट’वर तपास केंद्रित
बीअरबारप्रकरण : टाईल्स् व्यावसायिक भूमिगत, पोलिसांकडून पाचारण
यवतमाळ : बीअरबारमधील गोळीबार प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असून हॉटेल व्यवस्थापक आणि त्या टाईल्स् व्यावसायिकाला चौकशीसाठी पाचारण केले. मात्र हा व्यावसायिक भूमिगत झाला असून हॉटेल व्यवस्थापनानेही एक दिवसाची मुदतवाढ मागितली आहे. दरम्यान पोलिसांनी रिव्हॉल्वरमधून झाडल्या गेलेल्या त्या ‘बुलेट’वर लक्ष केंद्रीत केले आहे.
गेल्या आठवड्यात दारव्हा रोडवरील एका पॉश हॉटेलच्या बीअरबारमध्ये गोळीबार झाला होता. त्यात हॉटेलच्या काचा फुटल्याने कारवाई टाळण्यासाठी पाच हजाराची तत्काळ भरपाईही दिली गेली. शहरातील एका टाईल्स् व्यावसायिकाने आपल्या परवाना प्राप्त रिव्हॉल्वरमधून हा गोळीबार केला होता. विशेष असे पोलीस यंत्रणा आणि त्यांचा खुफिया विभाग या घटनेपासून अनभिज्ञ होता. ‘लोकमत’ने या गोळीबारीचे वृत्त प्रकाशित करताच पोलिसांची झोप उघडली. एसडीपीओ कार्यालयाने या वृत्ताची दखल घेत चौकशी सुरू केली. त्या पॉश हॉटेलच्या व्यवस्थापनाला तसेच टाईल्स् व्यावसायिकाला बयानासाठी हजर राहण्याचा संदेश पाठविला गेला. मात्र हा व्यावसायिक आपल्या दुकानातून भूमिगत असल्याचे सांगितले जाते.
हॉटेल व्यवस्थापनाने ३१ डिसेंबरच्या गर्दी व व्यवसायाचे कारण पुढे करून बयानासाठी एक दिवस विलंबाने हजर होण्याची परवानगी मागितली. पोलिसांनी ‘बुलेट’वर तपास केंद्रीत केला आहे. परवाना प्राप्त रिव्हॉल्वर असल्याने ती आत्मसंरक्षणासाठी आहे. या रिव्हॉल्वरमधील गोळी नेमकी कुठे आणि केव्हा झाडली याचा हिशेब पोलीस त्या टाईल्स् व्यावसायिकाला मागणार आहे. तो टाईल्स् व्यावसायिकही पर्यायी ‘बुलेट’ उपलब्ध होऊ शकते का याच्या प्रयत्नात आहे. तर पोलीसही एखादवेळी गोळी नेमकी केव्हा झाडली याचा अंदाज घेण्यासाठी ‘बॅलेस्टीक एक्सपर्ट’ची मदत घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)