मारेगावात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर धरणे
By Admin | Updated: October 28, 2014 23:09 IST2014-10-28T23:09:23+5:302014-10-28T23:09:23+5:30
निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाचे शेतकऱ्यांप्रती असलेले उदासीन धोरण, यामुळे शेतकरी देशोधडीला लागत आहे. बळीराजाला वाचविण्यासाठी शेतमालाला योग्य भाव द्यावा, यासाठी संभाजी

मारेगावात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर धरणे
मारेगाव : निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाचे शेतकऱ्यांप्रती असलेले उदासीन धोरण, यामुळे शेतकरी देशोधडीला लागत आहे. बळीराजाला वाचविण्यासाठी शेतमालाला योग्य भाव द्यावा, यासाठी संभाजी ब्रिगेडतर्फे येथे २४ आॅक्टोबरला धरणे देऊन तहसीलदारांमार्फत राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले.
सध्या शेतकरी अस्मानी संकटात सापडले आहे़ निसर्गाच्या लहरीपणाने सोयाबीन हे नगदी पीक हातचे गेले आहे़ कापूस या दुसऱ्या नगदी पिकाचीही वाट लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीवर केलेला खर्चही निघणे अवघड आहे़ नगदी पिकांनीच धोका दिल्याने वर्षभर जगावे कसे आणि नवीन हंगामात शेती कशी उभारावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे़ त्यातच शेतमालाच्या किमतीबाबत शासनाचे उदासीन धोरण आहे़ सध्या शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन व कापूस आला आहे़ मात्र शासनाच्या नियंत्रणातील खरेदी बंद आहे़ त्याचा लाभ खासगी व्यापारी घेत असून जागतिक पातळीवर सोयाबीन व कापूस पिकांचे भाव गडगडल्याचे सांगून शेतकऱ्याकडील सोयाबीन व कापूस अल्प दरात खरेदी करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत आहे़ शेतमालाच्या किमतीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडतर्फे मार्डी चौकात धरणे देण्यात आले़ आंदोलनात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी सहभागी झाले होते़ त्यानंतर येथील तहसीलदारामार्फत राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले़
या निवेदनातून शासकीय खरेदी सुरू करावी, कापसाला सात हजार रूपये, सोयाबीनला पाच हजार रुपये प्रती क्विंटल भाव द्यावा, कमी दरात शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, कापूस निर्यात खुली करावी, बाहेर देशातून येणाऱ्या कापसावर आयात कर वाढवावा, शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या़ धरणे आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष रूद्रा पाटील कुचनकर, तालुकाध्यक्ष संतोष राजूरकर, अनंत मांडवकर, अनामिक बोढे, ज्योतीबा धोटे, प्रमोद लडके, राहुल घागी, प्रकाश कोल्हे, जयंत वानखेडे, रामदास आत्राम आदींसह तालुक्यातील शेतकरी सहभागी होते. (शहर प्रतिनिधी)