फ्लोराईडयुक्त पाणी उठले जीवावर
By Admin | Updated: April 7, 2016 02:37 IST2016-04-07T02:37:00+5:302016-04-07T02:37:00+5:30
तालुक्यालगतच्या बंदीभागात किडणी, हाडे ठिसूळ होणे, दात खराब होणे अशा आजाराने नागरिक कमालीचे त्रस्त आहेत.

फ्लोराईडयुक्त पाणी उठले जीवावर
बंदीभागात घराघरात रुग्ण : किडणीसह विविध आजाराचे थैमान
महागाव : तालुक्यालगतच्या बंदीभागात किडणी, हाडे ठिसूळ होणे, दात खराब होणे अशा आजाराने नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. एक नव्हे, दोन नव्हे तर तीन-चार गावात या रोगाने थैमान घातले आहे. किडणीचा भयंकर आजार आणि प्रचंड खर्चाची बाजू सावरताना सामान्य कुटुंब अक्षरश: मेटाकुटीला आलेले आहे. उपचारासाठी हाती काहीच शिल्लक नाही. आता जीवन जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
उमरखेड तालुक्याच्या बंदीभागात आदिवासी, बंजाराबहुल गावे आहेत. चिखली या छोट्याशा गावात फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे २२ रुग्ण किडणीच्या आजाराचे शिकार बनले. त्यातील एक स्वत: डॉक्टर आहेत. डॉ. एल.डी. चव्हाण (७०) यांचा या रोगाबाबतचा अनुभव भयंकर असून हृदय पिळवटून टाकणारा आहे. आतापर्यंत डॉक्टरवर जे उपचार केले त्याचा खर्च आठ लाख रुपये झाला. आता दोन-तीन दिवसाआड त्यांना नांदेड येथे डायलेसिस उपचार करण्यासाठी जावे लागते. बंदीभागातील ३५ ते ५० वयोगटातील नैसर्गिक मृत्यू खरेतर आरोग्य यंत्रणेच अपयश लपवण्यासाठी नैसर्गिक मृत्यू म्हणून नोंदवले जात आहेत. चिखलीचे यशवंत राठोड (४२), मोहन जाधव (४५) नांदेड येथे उपचार घेत आहेत. बाळू जाधव (३५) याचा काही महिन्यापूर्वी मृत्यू झाला आहे. अन्य २२ रुग्ण या गंभीर आजाराने तडफडत आहेत. धमापूर, भवानी, मुरली, डोंगरगाव, बोरगाव दराटी, कोरटा, खरबी यासह परिसरातील नागरिक दूषित पाणी आणि फ्लोराईडयुक्त पाणी सेवनामुळे विविध आजाराने त्रस्त आहेत.
दराटी येथील उत्तमराव राठोड (४५) यांच्या उजव्या किडणीचे नुकतेच मुंबईत आॅपरेशन झाले. किडणीच काढून टाकण्यात आली. केवळ दूषित पाण्याचा होत असलेला पुरवठा हेच मुख्य कारण असावे असा त्यांचा वैयक्तिक समज असून डॉक्टरांनी मात्र अॅसेडीटीच्या गोळ्याच्या अतिसेवनाने हा आजार बळावल्याचे निदान केले. दराटीत या आजाराने आतापर्यंत चार मृत्यू झाले. टाकळीला राहुल नामक तरुण नुकताच याच आजाराने दगावला आहे. प्रशासन आणि बंदीभागातील आदिवासी यांची कायम नाळ तुटलेली आहे. कोरटा, दराटी येथे आरोग्य उपकेंद्र आहेत. त्यात औषध डॉक्टरांचा कायम तुटवडा असतो. वेळेत उपचार मिळत नाही. तालुका जिल्हा मुख्यालयी जावून उपचार करायचे झाल्यास रात्री-बेरात्री पैनगंगा अभयारण्यातील प्राण्याची भीती असते. बोरगाव येथे मुलगी आणि वडील आस्वलाने मारले होते. त्या जयस्वाल कुटुंबाला अद्याप लाभ मिळाला नाही. (शहर प्रतिनिधी)