पाच प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार
By Admin | Updated: October 3, 2015 02:20 IST2015-10-03T02:20:56+5:302015-10-03T02:20:56+5:30
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्मदिवस शेतकरी दिन म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

पाच प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार
यवतमाळ : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्मदिवस शेतकरी दिन म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, संतोष पाटील, संदीप महाजन, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी राजेश देवते आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रातचांदणा येथील शेतकरी अरविंद बेंडे, जरूर ता. घाटंजी येथील विजय जोगी, झाडगाव ता. राळेगाव येथील गजानन निवल, कोठा ता. कळंब येथील केशव निमकर, खापरी ता. घाटंजी येथील संजय गोडे या प्रगतीशील शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, भेटवस्तू, रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रगतीशिल शेतकऱ्यांचा आदर्श घेऊन आधुनिक पध्दतीने शेती करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. बळीराजा चेतना अभियानांतर्गत कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासोबतच आधुनिक पध्दतीने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढवावा, असे सांगितले. यावेळी शेतकरी अरविंद बेंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांचेही यावेळी भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसीलदार दिलीप झाडे यांनी केले. सूत्रसंचालन मंडळ अधिकारी एकनाथ बिजवे यांनी केले. तर आभार तालुका कृषी अधिकारी माळोदे यांनी मानले.
शेतकरी दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी
डॉ. प्रशांत नाईक, जिल्हाधिकारी कार्यालयातील विभा घोडे यांच्यासह कृषी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठे सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)