दोन पक्षात पहिल्यांदाच लढत

By Admin | Updated: November 6, 2016 00:19 IST2016-11-06T00:19:44+5:302016-11-06T00:19:44+5:30

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून या निवडणुकीच्या

For the first time in two parties, the fight | दोन पक्षात पहिल्यांदाच लढत

दोन पक्षात पहिल्यांदाच लढत

विधान परिषद : काँग्रेस, शिवसेना-भाजपा युती उमेदवारासह अपक्ष रिंगणात
यवतमाळ : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन पक्षांमध्ये तुल्यबळ लढत होत आहे. काँग्रेस आणि शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार आमने-सामने उभे ठाकले आहे. दरम्यान उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन अपक्ष उमेदवारांनी रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे एक अपक्ष संदीप बाजोरिया यांच्यासह तीन उमेदवार रिंगणात आहेत.
यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा इतिहास बघितल्यास आतापर्यंत अपवाद वगळता पक्षाचे दोन उमेदवार कधीच आमने-सामने आले नाही. पक्षाच्या उमेदवाराला येथे अपक्षाचाच सामना करावा लागला. मात्र यावेळी शिवसेना-भाजपा युती सत्तेत असल्याने त्यांनी आपला उमेदवार रिंगणात उतरविला आहे. काँग्रेसचे शंकर बडे आणि युतीचे तानाजी सावंत यांच्यात लढत होत आहे. पक्षाचे दोन उमेदवार आमने-सामने उभे ठाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. जिल्ह्यातील दहा नगरपरिषदा, १६ नगरपंचायती आणि जिल्हा परिषदेतील ६२ सदस्य, १६ पंचायत समितीचे सभापती असे ४४० मतदार आहे. सर्वच प्रमुख पक्षांकडून या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याकडे विधान परिषदेत जाण्यासाठी संख्याबळ असल्याचा दावा केला जात आहे. विधान परिषदेत जाण्यासाठी किमान २२० सदस्यांकडून पसंतीक्रम मिळविणे आवश्यक आहे. हा जादुई आकडा गाठण्यासाठी पक्षाचे उमेदवार कामाला लागले आहे. ४४० मतदारांना दूरध्वनीवरून या उमेदवारांनी थेट संपर्क केला. ‘आशीर्वादा’साठी ‘प्रसाद’ही वाटला जाईल, असा शब्द या उमेदवारांनी मतदारांना दिला आहे. आता खऱ्या अर्थाने घोडा मैदानाला सुरुवात झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतून दिलेला उमेदवार म्हणून काँग्रेस प्रचार करीत आहे. तर भाजपा-शिवसेनेतील स्टार नेते मंडळी उमेदवाराच्या प्रचारासाठी उतरली आहे. मतदारांची सर्वाधिक संख्या असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तर भाजपा-शिवसेनेने अपक्ष आणि इतरही पक्षातील मतदारांची गोळा बेरीज सुरू केली आहे. २२० चा आकडा आवश्यक असला तरी नियोजन मात्र ४४० मतांचे केले जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

संख्याबळाचा अंदाज कठीण
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत विधान परिषदेतील मतदारांना आयतीच संधी मिळाली आहे. नगरपरिषद निवडणूक रिंगणाबाहेर असलेल्या, पक्षाकडून तिकीट कापण्यात आलेल्या नगरसेवकांचे मतदानही विधान परिषदेसाठी निर्णायक ठरणारे आहे. पक्षांकडून त्यांच्या बाजूने असलेल्या आकडेवारीच्या दाव्यांमध्ये मोठी तफावत आहे. स्थानिक पातळीवरच्या राजकीय घडामोडीत पुलाखालून बरेच पाणी गेल्याने अद्याप तरी संख्याबळ कुणाकडे याचा अंदाज लावता येणे शक्य नाही. राजकीय पक्षांच्या दोनही उमेदवारांनी जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या सदस्यांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. ज्या आठ नगरपरिषदांमध्ये निवडणूक आहे, तेथील राजकीय गुंतागुंत सहजासहजी लक्षात येणारी नाही. त्यामुळे उर्वरित क्षेत्रात आघाडी घेणाऱ्यालाच विजयाचा टप्पा गाठता येणार आहे.

Web Title: For the first time in two parties, the fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.