अखेर सेनेचा जय महाराष्ट्र
By Admin | Updated: June 24, 2014 00:05 IST2014-06-24T00:05:15+5:302014-06-24T00:05:15+5:30
शिवसेना-भाजपा महायुतीने जिल्हा परिषदेतील सत्तेला अखेर ‘जय महाराष्ट्र’ केला. पाठिंबा काढत असल्याचे अधिकृतपत्र जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

अखेर सेनेचा जय महाराष्ट्र
पाठिंबा काढला : जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी अल्पमतात
यवतमाळ : शिवसेना-भाजपा महायुतीने जिल्हा परिषदेतील सत्तेला अखेर ‘जय महाराष्ट्र’ केला. पाठिंबा काढत असल्याचे अधिकृतपत्र जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष जिल्हा परिषदेत अल्पमतात आले आहे. त्याचा परिणाम सर्वसाधारण सभांमध्ये कोणताही ठराव मंजूर करून घेताना पहायला मिळणार आहे.
शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार संजय राठोड यांच्या घोषणेनंतरही पाठिंबा काढण्याबाबत संदिग्धता व्यक्त केली जात होती. नेत्याच्या दबावात वेळ मारुन नेण्यासाठी ही घोषणा केली असावी असा तर्कही लावला जात होता. राष्ट्रवादीकडून तर हे शक्यच नाही, याची जोरदार ग्वाही दिली जात होती. मात्र शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांचाच दबाव वाढल्याने निर्णय घ्यावा लागला. यासंदर्भात रविवारी विश्रामगृहावर शिवसेना सदस्यांची बैठक झाली. सर्वांनीच पाठिंबा काढण्याचे समर्थन केले. त्यामुळे अखेर दहा सदस्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन देऊन यापुढे राष्ट्रवादीला पाठिंबा राहणार नाही, हे स्पष्ट केले. शिवाय राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, समिती सभापती अल्पमतात आल्यामुळे यापुढे कोणताही निर्णय बहुमत सिद्ध करूनच मंजूर करण्यात यावा, अशीही मागणी शिवसेना सदस्यांनी निवेदनातून केली आहे. भाजपा सेनेसोबत असल्याने आमचीही तीच भूमिका आहे, असे भाजपा गटनेते अमन गावंडे यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या राजकारणात प्रथमच राष्ट्रवादीने काँग्रेसला बाहेर ठेऊन सत्ता स्थापन केली होती. मात्र या दोनही पक्षात स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्तेवरून कुरबूर सुरूच होती. शिवसेनेचे जिल्हा परिषदेतील दोन सभापती काँग्रेसने आपल्या गोटात ओढून घेतले. अविश्वास ठरावाच्या वेळी तटस्थ भूमिका घेऊन या बंडखोर सभापतींना काँग्रेसने अभय दिले. त्यानंतर राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेत निर्णय घेत असताना शिवसेनेला गृहित धरले जात नव्हते. शिवसेना सदस्यांची कोंडी होत होती. मात्र जिल्हा प्रमुख भूमिका घेत नसल्याने कुणीही उघडपणे बोलण्यास तयार नव्हते. शेवटी श्रेष्ठींकडूनच दबाव वाढल्याने जिल्हा प्रमुखाला भूमिका घ्यावी लागली. जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ आॅगस्टमध्ये संपुष्टात येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रमुखाने सत्तेतून बाहेर पडण्याच्या निर्णयासाठी बराच उशीर केल्याचा सूरही सेनेच्या गोटातून उमटत आहे. आज शिवसेनेकडे १२ पैकी दहा सदस्य आहेत. दोन सदस्य तभा सभापतींना पक्षाने निष्काशित केले.निर्णयासाठीचे बहुमत राष्ट्रवादीकडे नाही. पद असूनही निर्णय आपल्या बाजूनेच होईल, याची शाश्वती राष्ट्रवादीला नाही. (कार्यालय प्रतिनिधी)