अल्पसंख्यक शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा
By Admin | Updated: April 1, 2016 02:45 IST2016-04-01T02:45:29+5:302016-04-01T02:45:29+5:30
मुख्याध्यापकांच्या दुर्लक्षाने जिल्ह्यातील अल्पसंख्यक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची स्थिती निर्माण झाली होती.

अल्पसंख्यक शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा
‘लोकमत’चा पाठपुरावा : आठवडाभरात एक लाख बँक खात्यांची माहिती अपडेट
अविनाश साबापुरे यवतमाळ
मुख्याध्यापकांच्या दुर्लक्षाने जिल्ह्यातील अल्पसंख्यक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची स्थिती निर्माण झाली होती. ‘लोकमत’ने यासंदर्भात वारंवार पाठपुरावा केल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या मुख्याध्यापकांनी अवघ्या पाच दिवसात एक लाख विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांची माहिती अद्ययावत केली. त्यामुळे आता शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अल्पसंख्यक विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीची रक्कम मिळविण्यासाठी बँक खात्यांची माहिती अद्ययावत करण्याकडे बहुतांश मुख्याध्यापक दुर्लक्ष करीत होते. जिल्ह्यात एक लाख सात हजार ६८९ विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत. परंतु, १५ मार्च ही अंतिम तारीख आल्यावरही ११ हजार विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करण्यात आलेली नव्हती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी कठोर भूमिका घेत, जे मुख्याध्यापक माहिती भरणार नाहीत, त्यांच्या वेतनातून शिष्यवृत्तीची रक्कम कापण्याची तंबी दिली. त्यामुळे अवघ्या आठवडाभरात तब्बल एक लाख पाच हजार २१६ विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती अपडेट करण्यात आली.
महाराष्ट्रात यवतमाळ अव्वल
अल्पसंख्यक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी बँक खात्यांची माहिती अपडेट करण्यात संपूर्ण राज्यातच हयगय दिसून आली. त्यामुळे संचालनालयाने तीनवेळा मुदतवाढीही दिल्या. १५ मार्च ही निर्वाणीची मुदतवाढही टळली. अखेर कसेबसे का होईना, पण शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा झाला. बँक खात्यांची माहिती भरण्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत यवतमाळ जिल्हा महाराष्ट्रात अव्वल ठरला आहे. यवतमाळच्या मुख्याध्यापकांनी ३० मार्चपर्यंत ९८ टक्के माहिती अपडेट केली आहे. त्यापाठोपाठ अहमदनगर ९७, जळगाव ९४, तर नांदेड जिल्ह्यात ९१ टक्के माहिती अपडेट झाली. इतर जिल्हे मात्र बरेच मागे आहेत. धुळे, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील मुख्याध्यापक तर ४० टक्केही माहिती देऊ शकलेले नाहीत.
अल्पसंख्यक विद्यार्थ्यांना मिळणारी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती हा महत्त्वाचा मुद्दा आहे. बँक खात्यांची माहिती अपडेट करण्यात सुरवातीला हयगय झाली होती. पण नंतर अत्यंत कमी कालावधीत आपण ही माहिती अपडेट करवून घेतली. आज संपूर्ण महाराष्ट्रातून आपण माहिती अपडेट करण्यात पहिल्या क्रमांकावर आहोत. त्यामुळे सर्वच पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल. शिवाय यापूर्वीच्या वर्षीच्या शिष्यवृत्तीबाबतही प्रयत्न करण्यात येईल.
- चिंतामण वंजारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)