भय इथले संपत नाही... ; वृद्धेच्या अंत्यसंस्कारांकडे फिरवली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 21:40 IST2020-05-28T21:07:54+5:302020-05-28T21:40:41+5:30
: एका निराधार वृद्ध महिलेचा अचानक मृत्यू झाला. मात्र कोरोनाच्या भयाने तिच्या अंत्यसंस्काराकडे गावकऱ्यांनी पाठ फिरविली. या प्रकाराची माहिती मिळताच पांढरकवडातील नगरसेवक बंटी जुवारे यांनी तिच्या अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेत तिला अग्नी दिला. मानवी संवेदना हरवत चालल्याची प्रचिती देणारी ही घटना तालुक्यातील गणेशपूर (सिंचन) येथे घडली.

भय इथले संपत नाही... ; वृद्धेच्या अंत्यसंस्कारांकडे फिरवली पाठ
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : एका निराधार वृद्ध महिलेचा अचानक मृत्यू झाला. मात्र कोरोनाच्या भयाने तिच्या अंत्यसंस्काराकडे गावकऱ्यांनी पाठ फिरविली. या प्रकाराची माहिती मिळताच पांढरकवडातील नगरसेवक बंटी जुवारे यांनी तिच्या अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेत तिला अग्नी दिला. मानवी संवेदना हरवत चालल्याची प्रचिती देणारी ही घटना तालुक्यातील गणेशपूर (सिंचन) येथे घडली.
बयाबाई रामचंद्र शितोडे (८०) असे मृत वृद्धेचे नाव आहे. ती मुळची केळापूर येथील रहिवासी असून गेल्या पाच वर्षांपासून लगतच्या गणेशपूर सिंचन येथे वास्तव्याला होती. एका झोपडीत ती राहत होती. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढत आहे. अशातच बुधवारी तिची प्रकृती गंभीर बनून त्यात तिचा मृत्यू झाला. ही वार्ता गावभर पसरली. परंतु पुढील सोपस्कारासाठी गावातील कुणीच पुढे येईना. अखेर गावातील एका सामाजिक कार्यकत्यार्ने यासंदर्भात पांढरकवडातील नगरसेवक बंटी जुवारे यांना माहिती दिली. जुवारे यांनी लगेच पोलीस उपनिरीक्षक सत्यजित मानकर यांच्या कानावर ही गोष्ट टाकली. बंटी जुवारे व सत्यजित मानकर तातडीने गणेशपुरात पोहोचले. वृद्धेचा मृतदेह लगेच पांढरकवडा येथे आणण्यात आला. तेथील कायदेशीर सोपस्कर पार पाडल्यानंतर बंटी जुवारे यांनी अंत्यसंस्काराची सर्व सामग्री आणून वृद्धेवर अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्काराला गेले तर १४ दिवस होम क्वारंटाईन राहावे लागेल, अशी अफवा वृद्धेच्या जवळच्याच एका नातलगाने गावात पसरविल्याने गावकऱ्यांनी अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला नसल्याचे सांगितले जाते.
सदर वृद्धा नाथजोगी समाजाची होती. गावात भिक्षा मागून ती उदरनिर्वाह करत होती. तिच्या मृत्यूनंतर कोरोनाच्या भयाने अंत्यसंस्कारासाठी नागरिकांनी तयारी दाखविली नाही. त्यामुळे नगरसेवक बंटी जुवारे व मी स्वत: अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला.
- सत्यजित मानकर,
पोलीस उपनिरीक्षक, पांढरकवडा