फौजदार, दोन पोलीस कर्मचारी निलंबित
By Admin | Updated: June 26, 2014 00:01 IST2014-06-26T00:01:57+5:302014-06-26T00:01:57+5:30
स्थानिक गुन्हे शाखा आणि विशेष पथकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना दालनात पाचारण करून जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी त्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. एक फौजदार

फौजदार, दोन पोलीस कर्मचारी निलंबित
यवतमाळ : स्थानिक गुन्हे शाखा आणि विशेष पथकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना दालनात पाचारण करून जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी त्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. एक फौजदार आणि दोन पोलीस शिपायांना तत्काळ दालनातून बाहेर काढून निलंबनाची तंबीही दिली. सायंकाळी एका आदेशान्वये या तिघांना निलंबित करण्यात आले.
जिल्हा पोलीस दलात आव्हानात्मक गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिनस्थ एकूण सहा पथक आहेत. या पथकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कमालीची अनागोंदी वाढली आहे. पोलीस अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रणच राहिले नाही. त्यामुळे गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेकदा सूचना देऊनही या घटना नियंत्रित झाल्या नाही. शिवाय अनेक महत्त्वाचे तपासही रखडले आहेत. ही बाब लक्षात येताच जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी २५ जूनला सकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे, महेश तोगरवाड, फौजदार आर.डी. वाटाणे, सुगत पुंडगे, वाणी यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांना पेशीत बोलावले. या वेळी पसार आरोपींच्या अटकेवरून, घरफोडी, जबरी चोऱ्या यांचे नियंत्रण आणि गुन्हेगारांशी असलेल्या संबंधावरून अनेकांची कानउघाडणी करण्यात आली. तत्पूर्वी ताब्यातील आरोपी पसार झाल्याच्या कारणावरून एका फौजदाराला एसपी शर्मा यांनी चांगलेच झाडले. त्यानंतर दोन पोलीस शिपायांना एका गंभीर घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना न पुरविता दडपल्याने त्यांनाही चांगलेच झापले. तसेच फौजदारासह त्या शिपायांनाही तत्काळ दालनाबाहेर जाण्यास सांगून निलंबित करण्याची तंबी दिली. तसेच सायंकाळी त्यांना एका आदेशान्वये निलंबितही केले. त्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयातील वातावरण दिवसभर तापून होते. एसपी शर्मा यांनी विशेष पथकांमध्ये काही फेरबदल केले. या पथकातील कर्मचारी त्या पथकामध्ये देऊन कारभार सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली. (स्थानिक प्रतिनिधी)