आठ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद
By Admin | Updated: June 30, 2014 00:07 IST2014-06-30T00:07:55+5:302014-06-30T00:07:55+5:30
जिल्हा परिषदेतील लोणी-जवळा सर्कलमधील पाच उमेदवार आणि यवतमाळ नगरपरिषदेतील प्रभाग ३ च्या तीन उमेदवारांचे भवितव्य रविवारी मशीन बंद झाले. नगरपरिषदेत ३८.३७ टक्के तर

आठ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद
आज मतमोजणी : जिल्हा परिषद आणि नगरपरिषद पोटनिवडणूक
यवतमाळ : जिल्हा परिषदेतील लोणी-जवळा सर्कलमधील पाच उमेदवार आणि यवतमाळ नगरपरिषदेतील प्रभाग ३ च्या तीन उमेदवारांचे भवितव्य रविवारी मशीन बंद झाले. नगरपरिषदेत ३८.३७ टक्के तर जिल्हा परिषदेत ६०.७५ टक्के मतदान झाले.
लोणी-जवळा सर्कलचे सदस्य प्रताप राठोड यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी तर नगरपरिषदेत कॉंग्रेसच्या नगरसेविका वैजयंता उगलमुगले यांच्या निधनाने रिक्त जागेसाठी मतदान झाले.
जिल्हा परिषद सर्कलमध्ये कॉंग्रेसकडून प्रताप राठोड यांचे बंधू अजित राठोड, राष्ट्रवादीकडून राजन भागवत, शिवसेनेचे प्रवीण शिंदे, अपक्ष म्हणून अनोद जाधव, अमोल नाईक निवडणूक रिंगणात होते. या मतदारसंघासाठी कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दिग्गज नेत्यांनी चांगलाच घाम गाळला. त्यामुळे ही पोटनिवडणूक विधानसभेपूर्वीच नांदी समजली जात आहे. असेच वातावरण यवतमाळ नगरपरिषदेतील प्रभाग ३ च्या निवडणुकीत आढळून आले. येथे कॉंग्रेसकडून उषा प्रवीण दिवटे, भाजपाकडून माधुरी नखाते आणि अपक्ष छाया घुगे यांच्यात लढत झाली.
यवतमाळ शहरातील ११ मतदान केंद्रावर मतदान झाले. दहा हजार ५७५ मतदारांपैकी केवळ ३८.३७ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक २१ गावातील ३६ मतदान केंद्रांवर घेण्यात आली. उमरी-इजारा, शकलगाव येथील २०० मतदारांचे यादीत नाव नसल्याने त्यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. येथे मतदार यादी तपासली असता सर्व मतदारांची नावे आढळून आली. त्यानंतर सुधारित मतदार यादी घेऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
जवळा येथील केंद्रावर सुरुवातीलाच मशीन बंद पडली होती. नंतर येथे मतदान सुरळीत घेण्यात आले. या निवडणुकीची मतमोजणी सोमवार ३० जून रोजी होत आहे. आर्णी तहसील कार्यालयात सकाळी ८.३० वाजतापासून मोजणीला सुरुवात होणार आहे. तर नगरपरिषदेची मतमोजणी बचत भवनात सकाळी १० वाजता होणार आहे. लोकसभेतील पराभवानंतर कॉंग्रेसने दोन्ही ठिकाणी आपला जोर लावला. तर विजयाने उत्साह संचारलेल्या भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही मतदारांपर्यंत पोहोचण्याची कुठलीच संधी सोडली नाही. या निवडणुकीतून विधानसभेचे गणित आखले जाणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)