जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सक्तीच्या कर्ज वसुलीमुळे शेतकरी चिंताग्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 18:28 IST2025-03-26T18:27:22+5:302025-03-26T18:28:18+5:30
जिल्हा बँकेत आज बैठक : कर्ज मर्यादेत वाढची अपेक्षा

Farmers worried due to forced loan recovery from District Central Bank
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सक्तीची कर्ज वसुली सुरू आहे. कर्ज रकमेसह व्याजाची वसुली केली जात असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. जिल्हा बँकेत संचालक मंडळाची बुधवार, २६ मार्च रोजी बैठक आहे. यात शेतकरी हिताचे निर्णय घेतले जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
थकबाकीदार शेतकऱ्यांकडून व्याजासह कर्ज वसुली सुरू असल्यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. व्याजासह कर्ज वसुली करण्याची
ही प्रथा शेतकऱ्यांचीच बैंक राबवत असल्याचा आरोप केला जात आहे. सततची नापिकी व शेतमालाला नसलेले भाव पाहता शेतकरी संकटात सापडला आहे. आजरोजी शेतकऱ्याजवळ काहीच शिल्लक नाही. अशावेळी बँकेच्या सक्तीच्या कर्ज वसुलीमुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेला ३ लाख रुपयांच्या वर कर्ज मंजुरीचे अधिकार नाहीत. ज्या शेतकऱ्यांना तीन लाखांवर कर्ज पाहिजे आहे, अशा शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे जिल्हा बँकेकडे मंजुरीसाठी पाठवली जातात. परंतु, त्यामध्ये बराच कालावधी लोटत असल्यामुळे उशिरा कर्ज मिळते. परिणामी शेतकऱ्यांचे नियोजन बिघडते.
"पाच लाख रुपये कर्ज मंजुरीचे अधिकार संबंधित शाखेला दिले तर शेतकऱ्याची गैरसोय थांबणार आहे. कर्जाची मर्यादा वाढवून देताना किमान २० टक्के तरी जास्त कर्ज मंजूर करावे. जेणेकरून शेतकऱ्यांनी भरलेल्या पैशानंतर त्यांच्या हाती किमान २० ते २५ हजाराची रक्कम शिल्लक राहील. संचालक मंडळाने याबाबत विचार करावा."
- संजय दौलत नाईक, अध्यक्ष, विविध कार्यकारी सोसायटी पेढी
"जिल्हा बँकेच्या शाखेला यापूर्वी तीन लाखांच्या वर कर्ज मंजुरीचे अधिकार होते. परंतु बऱ्याच प्रकरणात अनियमितता आढळून आली. त्यामुळे कर्ज मंजुरीचे अधिकार मुख्य शाखेकडे ठेवण्यात आले आहे. व्याजाच्या रकमेचे कोट्यवधी रुपये राज्य शासनाकडेच बाकी आहेत. कर्जाची रक्कमही नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणारी आहे त्यामुळे कर्ज वसुली सुरू आहे."
- प्रा. शिवाजी राठोड, संचालक, जिल्हा बँक, यवतमाळ