पेरणी आटोपलेले शेतकरी चिंतेत
By Admin | Updated: June 24, 2014 00:07 IST2014-06-24T00:07:22+5:302014-06-24T00:07:22+5:30
तालुक्यात खरीप हंगामाची सर्व शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व तयारी केली आहे. नुकतीच मृग नक्षत्राने हजेरी लावल्याने मृगातच पेरण्या व्हाव्या म्हणून कापूस व सोयाबीनच्या पेरण्या वेगाने सुरू झाल्या आहे़

पेरणी आटोपलेले शेतकरी चिंतेत
दमदार पावसाची प्रतीक्षा : यंदा सोयाबिनची लागवड घटली
मारेगाव : तालुक्यात खरीप हंगामाची सर्व शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व तयारी केली आहे. नुकतीच मृग नक्षत्राने हजेरी लावल्याने मृगातच पेरण्या व्हाव्या म्हणून कापूस व सोयाबीनच्या पेरण्या वेगाने सुरू झाल्या आहे़ सुमारे ८0 टक्के पेरण्या पूर्ण झाल्याचा अंदाज आहे़
गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असूनही पाऊस येत नसल्याने पेरणी आटोपलेले शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहेत़ यावर्षीच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने तालुक्यात ४५ हजार २९५ हेक्टर जमिनीवर खरिपाची लागवड करण्याचे नियोजन केले आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी त्यासंबंधी संपूर्ण नियोजन केले. मागील हंगामात सोयाबीनचा पेरा जास्त होता़ परंतु निसर्गाच्या अवकृपेने सोयाबीन हातचे गेले़ त्यामुळे यावर्षी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. सोयाबिनचे महागडे बियाणे घेऊन पेरणी करण्याचा धोका स्विकारण्यापेक्षा कपाशी लागवड बरी म्हणून यावर्षी सोयाबिनचे क्षेत्र कमी होऊन कापूस क्षेत्र वाढणार आहे़
मागील वर्षी १९ हजार ९२७ हेक्टरवर कापसाची पेरणी करण्यात आली होती़ यावर्षी २० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात कापूस लागवड अपेक्षित आहे. सोयाबिनचे क्षेत्र यावर्षी घटणार आहे़ सोयाबीन १७ हजार हेक्टर, तूर सात हजार ४००, संकरीत ज्वारी ७५० हेक्टर, ३५ हेक्टरवर मूग व १० हेक्टरवर उडीद व इतर पिके अपेक्षित आहे़ तालुक्यात ५२ कृषी केंद्रात बियाणे, खते उपलब्ध असून बियाणे, खतांचा काळाबाजार होऊ नये म्हणून कृषी विभागाने भरारी पथक गठित केले आहे.
तालुका कृषी विभागाचे कर्मचारी बिज प्रक्रिया, घरच्या बियाण्याचा वापर, शतकोटी वृक्ष लागवड, खतांचा वापर, मृदू व जलसंधारण उपचार, कार्यालयातील उपलब्ध कृषी साहित्याचे वितरण यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. तरीही शेतकऱ्यांकडून कृषी योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नसल्याचा आरोप होत आहे़ तालुका कृषी कार्यालयामार्फत तसेच पंचायत समिती कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात़ मात्र त्या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही़ मिनी किट, शेती अवजारे, ताडपत्री, फवारणी यंत्र, मोटारपंप आॅईल इंजीन, किटकनाशके आदी योजना राबविल्या जातात़ तथापि सामान्य शेतकऱ्यांना या योजनांची माहितीच मिळत नसल्याने अनेक शेतकरी त्यापासून वंचित राहतात़ मारेगाव तालुक्यात यावर्षी सोयाबीनचा पेरा घटण्याची चिन्हे दिसत आहे. पावसाअभावी पेरणी उलटण्याची भीती असल्याने शेतकरी आता पर्यायी पिकाच्या शोधात दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)