शेतकरी-कामगार उद्ध्वस्त

By Admin | Updated: November 16, 2014 22:55 IST2014-11-16T22:55:12+5:302014-11-16T22:55:12+5:30

सुपिक जमीन आणि मेहनती शेतकऱ्यांच्या साथीला महागाव तालुक्यात साखर कारखाना आला. अवघ्या काही दिवसातच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले.

Farmers-Workers Destroyed | शेतकरी-कामगार उद्ध्वस्त

शेतकरी-कामगार उद्ध्वस्त

रितेश पुरोहित - महागाव
सुपिक जमीन आणि मेहनती शेतकऱ्यांच्या साथीला महागाव तालुक्यात साखर कारखाना आला. अवघ्या काही दिवसातच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले. बाजारपेठेतही उलाढाल वाढली. सर्व काही सुरळीत सुरू असताना साखर कारखाना बंद पडला आणि विकासाचे स्वप्न एका क्षणात उद्ध्वस्त झाले. महागाव तालुक्यातील गुंज येथील साखर कारखाना गेल्या चार वर्षांपासून बंद असल्याने सर्वच देशोधडीला लागले आहे. कारखाना सुरू करण्यासाठी कोणत्याही हालचाली होत नसून या कारखान्याच्या बंद धुरांड्याकडे पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी येते.
शेतकरी कारखानदार झाला पाहिजे या उद्देशाने महागाव तालुक्यात १९९७-९८ मध्ये साखर कारखान्याची स्थापना करण्यात आली. शेतकऱ्यांनी आपल्या घामाचा पैसा आणि शंभर एकर जमीन कारखान्यासाठी दिली. कारखान्याच्या धुरांड्यातून धूर निघू लागला. उसाचे मळे शेतशिवारात फुलू लागले. या कारखान्याला माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे नाव देण्यात आले. कारखाना सुरू झाल्याने सुमारे चार हजार कामगारांना प्रत्यक्ष काम मिळाले. त्यासोबतच शेकडो हातांना अप्रत्यक्ष काम मिळाले. कुणी किराणा दुकान, कृषी केंद्र, हॉटेल, खानावळ, सलून यासह विविध दुकाने सुरू केली. त्यावर आपला उदरनिर्वाह करू लागले. जणू महागाव, पुसद तालुक्याची आर्थिक वाहिनीच हा कारखाना झाला होता. तालुक्यातील अधरपूस, लोअरपूस, अमडापूर प्रकल्प, जामनाला प्रकल्पासह दहा लघु प्रकल्पावर शेतकरी सिंचन करू लागले. पुसद, महागाव तालुक्यात पाच लाख टन ऊस उभा होता. शेतकऱ्यांच्या हातात पैसा दिसायला लागला. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावू लागले. मात्र या कारखान्याला कोणाची तरी नजर लागली आणि २००६ साली हा कारखाना अवसायनात निघाला.
राजकीय हेव्यादाव्यातून बंद पडलेल्या या कारखान्यावर १०० कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. सक्षम नेतृत्वाअभावी कारखाना कायमचा बंद आहे. मध्यंतरी २००७ मध्ये वारणा समूहाने कारखाना भाडेतत्वावर घेतला होता. त्यांनी पाच गाळप काढून २०१२ मध्ये करार मोडित काढला. तेव्हापासून या कारखान्यावर अवकळा आली आहे. सध्या तर दोन ते तीन सुरक्षा रक्षक येथे कारखान्याची रखवालदारी करताना दिसतात. कधी काळी गजबलेल्या या परिसरात आता औदासिन्य आले आहे. कारखाना बंद पडल्याचा परिणाम उसाच्या उत्पादनावरही झाला. सध्या केवळ ३० ते ४० हजार टन ऊस तालुक्यात उभा आहे. कामगार बेरोजगार झाले असून मिळेल ते काम करताना दिसत आहे. फुललेली बाजारपेठही थंड झाली आहे. ५० लहान मोठ्या व्यवसायांच्या भरोश्यावर तालुक्यात वर्षभरात दोनशे कोटींची उलाढाल होत होती. तीही आता ठप्प झाली आहे. तालुक्यात कोणताही व्यवसाय उद्योग नसल्याने शेकडो तरुण कामाच्या शोधात शहराकडे धाव घेत आहे.

Web Title: Farmers-Workers Destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.