शेतकऱ्यांनी शोधाला दुग्ध व्यवसायातून प्रगतीचा मार्ग
By Admin | Updated: March 30, 2015 02:08 IST2015-03-30T02:08:37+5:302015-03-30T02:08:37+5:30
पाच वर्षापूर्वी महागाव तालुक्यात दुधासाठी शहराकडे धाव घ्यावी लागत होती. तालुक्यात कुठेही पुरेसे दूध उपलब्ध नव्हते.

शेतकऱ्यांनी शोधाला दुग्ध व्यवसायातून प्रगतीचा मार्ग
महागाव : पाच वर्षापूर्वी महागाव तालुक्यात दुधासाठी शहराकडे धाव घ्यावी लागत होती. तालुक्यात कुठेही पुरेसे दूध उपलब्ध नव्हते. मात्र दुष्काळी परिस्थितीने शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळले असून आता तालुक्यात दररोज ६० ते ७० हजार लिटर दूध उत्पादन होत आहे. खासगी कंपन्या ४० ते ६० रुपये लिटर प्रमाणे दूध खरेदी करीत असल्याने अनेक जण दुग्ध व्यवसायाकडे वळत आहे.
महागाव तालुका हा सर्वस्वी कृषीवर अवलंबून असणारा तालुका आहे. मात्र गत काही वर्षांपासून दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. ७५ हजार हेक्टर जमीन क्षेत्र असलेल्या या तालुक्यात ३० हजारावर शेतकरी आहे. केवळ शेती हाच एकमेव चरितार्थाचा व्यवसाय होता. कुणीही पूरक व्यवसायाकडे वळत नव्हता. त्यामुळे दुष्काळाची झळ मोठ्या प्रमाणात जाणवत होती. परंतु अलिकडे दुष्काळानेच शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय करण्यास भाग पाडले. शेतीचाच एक भाग असलेल्या दुग्ध व्यवसायाकडे शेतकरी वळले. पंतप्रधान पॅकेज आणि इतर योजनांमधून शेतकऱ्यांनी गाई, म्हशी घेतल्या. आज तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे दोन-तीन दुधाळू जनावरे दिसत आहे.
दुधातून प्रगती साधता येते हे लक्षात आल्यावर अनेकांंनी दुग्ध व्यवसायाकडे मोर्चा वळविला. तालुक्यात ६० ते ७० हजार लिटर दुधाचे उत्पादन दररोज होत आहे. शासकीय दर अत्यल्प असल्याने शेतकरी खासगी कंपन्यांना आपले दूध विकत आहे. जागेवर फॅट काढून या कंपन्या शेतकऱ्यांना ४० ते ६० रुपये भाव म्हशीच्या दुधाला तर गाईच्या दुधाला ३० ते ४५ रुपये भाव देत आहे. त्यामुळे शेतकरी त्यांच्याकडेच आकर्षित होत आहे. महागाव, फुलसावंगी, खडका, हिवरा, मुडाणा, अंबोडा, सवना आदी गावात दूध संकलन केंद्र सुरू झाले आहे. या ठिकाणी शेतकरी आपले दूध देत आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी दुग्ध व्यवसायातून प्रगती साधत आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात आता जनावरांसाठी चारा उत्पादक सुरू केले आहे. (तालुका प्रतिनिधी)