मजुरांच्या शोधात शेतकऱ्यांची भटकंती

By Admin | Updated: October 4, 2014 23:34 IST2014-10-04T23:34:08+5:302014-10-04T23:34:08+5:30

दिवाळीसारखा मोठा सण तोंडावर आला असताना कापूस, सोयाबीन ही पिके शेतात उभी आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सध्या मजुरांची मोठ्याप्रमाणात पळवापवळी सुरू असल्याने

Farmers' wandering in labor search | मजुरांच्या शोधात शेतकऱ्यांची भटकंती

मजुरांच्या शोधात शेतकऱ्यांची भटकंती

पुसद : दिवाळीसारखा मोठा सण तोंडावर आला असताना कापूस, सोयाबीन ही पिके शेतात उभी आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सध्या मजुरांची मोठ्याप्रमाणात पळवापवळी सुरू असल्याने पीक काढण्यासाठी लागणाऱ्या मजूरांची कधी नव्हे एवढी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी शेतकरी मजुरांच्या शोधात वणवण भटकंती करीत आहे. मजुरांची विनवणी करून व मजुरीच्या दरात
वाढ करूनसुद्धा मजूर मिळेनासे झाले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
भविष्यात शेती करावी की नाही, या निर्णयाप्रत शेतकरी येऊन ठेपले आहेत. शेतकऱ्यांपेक्षा शेतमजूरच सुखी असे चित्र असल्याचे शेतकरीवर्ग सांगत आहे. यावर्षी विधानसभा निवडणूक आल्याने मजुरांची चांगलीच चंगळ सुरू आहे. शेतात राबराब राबल्यानंतर ८० ते १०० रुपये रोज पडतो. परंतु एखद्या नेत्याच्या प्रचारात सहभागी झाल्यानंतर नेत्यांकडून जेवणखाण व भत्ता मिळत असल्याने मजूरवर्ग तिकडेच जात आहेत.
बहुतेक शेतकरी आपली शेती मक्त्याने देण्याच्या मानसिकते दिसत आहे. बदलत्या काळानुरूप शेतातील अनेक कामे यंत्रानेच केली जात असली तरीसुद्धा कापूस वेचणे, ज्वारी, खुडणी व सोयाबीन कापणी या कामांसाठी शेतकऱ्यांना मजुरांवरच विसंबून राहावे लागते. दिवसेंदिवस शेती कामासाठी मजुंराची संख्या कमी होत असल्याने शेतकऱ्यांना मजूर सापडने कमी झाले आहे. शेतावर वर्षभर कामासाठी लागणाऱ्या गडी माणसांचे सालही प्रचंड वाढले आहे. आता कापूस शेतात फुटत आहे, तो वेचन्यासाठी मजूर नाही. वेचणीचा दर तीन ते चार रुपये प्रति किलो करूनही मजूर मिळेनासा झाला आहे.
शहरातील मजुरांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी शहराकडे धाव घेऊन मजुरांची गयावया करून त्यांची मने वळविण्यात मजुरांना त्यांच्या घरून शेतापर्यंत नेण्याची सोय वाहनाव्दारे करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शाळेतील विद्यार्थीसुद्धा कापूस वेचणीच्या कामी लागले आहे. परंतु शाळेमध्ये प्रथम सत्र परीक्षांची तयारी सुरू असल्याने विद्यार्थीसुद्धा उपलब्ध होत नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत मजुरांची चांगलीच चंगळ होत असून, शेतकरी मात्र भरडल्या जात आहे. सध्या सोयाबीन काढणीवर आले असताना परतीच्या पावसाचे आगमण झाले तर शेतातील पिकांची नासाडी होऊ नये या विवंचनेत शेतकरी आहे. शेतकऱ्यांचे उभे पीक नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक शेतकरी कुटुंबासह स्वत: शेतात राबत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Farmers' wandering in labor search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.