Farmers under Tipeshwar Sanctuary are desperate | टिपेश्वर अभयारण्यालगतचे शेतकरी हतबल

टिपेश्वर अभयारण्यालगतचे शेतकरी हतबल

ठळक मुद्देवन्य प्राण्यांचा धुमाकूळ : जंगलालगतची गावे हिंस्त्र प्राण्यांच्या दहशतीत, उपाययोजना करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
पारवा : वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढल्याने परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतातील उभी पिके उखडून टाकत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वनविभागाकडून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त केला जात नाही. शेतकऱ्यांनी वैयक्तिकरित्या बंदोबस्ताचा प्रयत्न केल्यास कारवाई होते. या परिसरातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
टिपेश्वर अभयारण्याला लागून अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. रानडुक्कर, रोही आदी वन्य प्राण्यांचा मुक्त संचार सुरू आहे. कपाशी, तूर, ज्वारी पिकांचे नुकसान केले जात आहे. सावरगाव, मंगी, वघारा, टाकळी, सावंगी(संगम), धामणधरी, ठाणेगाव, रामनगर, गणेरी, कालेश्वर, जांब, माथनी, शरद, सगदा, भिमकुंड या गावांच्या शिवारात शेती असलेले शेतकरी हतबल झाले आहेत. हिंस्त्र प्राण्यांचे हल्लेही शेतकरी, शेतमजुरांवर होत आहे. या जनावरांच्या भीतीने शेतात डफडी वाजवून कापूस वेचणी केली जात आहे. गेली काही दिवसांपासून वाघाचे दर्शन होत असल्याचे सांगितले जाते. भीतीपोटी शेतकरी, शेतमजूर शेतात जाणे टाळत आहेत. या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात पांढरकवडा उपवनसंरक्षकांना निवेदन देण्यात आले. पोचारेड्डी जिड्डेवार, गंगय्या बर्दीवार, मनोज जडगीलवार, सुभाष गोल्लीवार, मोहन अंदीवार, अशोक शेंदरे, नारायण नालमवार, विलास पेंटावार, वसंता वदीवार, प्रताप आनंदीवार आदींनी निवेदन दिले.

Web Title: Farmers under Tipeshwar Sanctuary are desperate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.