‘माझ्या आत्महत्येला मोदी सरकारच जबाबदार’, चिठ्ठी लिहून शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 05:53 IST2018-04-10T14:44:07+5:302018-04-11T05:53:29+5:30
कर्जबाजारीपणा, नापिकी आणि निराशेने घेरलेल्या एका शेतकऱ्याने आपल्या शेतात मंगळवारी सकाळी आत्महत्या केली.

‘माझ्या आत्महत्येला मोदी सरकारच जबाबदार’, चिठ्ठी लिहून शेतकऱ्याची आत्महत्या
यवतमाळ/घाटंजी : बोंडअळीची मदत मिळाली नाही, कर्जमाफीही मिळाला नाही, त्यामुळे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरून एका शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपविली. ‘माझ्या आत्महत्येची जबाबदारी नरेंद्र मोदी यांच्यावर राहील,’ अशी चिठ्ठी लिहून या शेतकºयाने प्राण त्यागला. घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथे मंगळवारी ही घटना घडली. शंकर चायरे (५०) असे त्यांचे नाव आहे.
चायरे यांच्याकडे सहा एकर शेती असून, यंदा कापसाची पेरणी केली होती. तीन-चार वर्षांपासून सतत नापिकी होत असल्याने कर्ज वाढले होते. त्यातच कापसावर बोंडअळीने प्रचंड हल्ला चढविला. त्यामुळे ३० टक्केही उत्पादन मिळाले नाही. त्यामुळे कर्ज कसे फेडावे ही चिंता त्यांना सतावत होती, असे त्यांची मुलगी जयश्रीने सांगितले.
मंगळवारी सकाळी ते गावालगतच्या आपल्या शेतात गेले. सुरुवातीला त्यांनी गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोर तुटला, नंतर त्यांनी कीटकनाशक घेतले. मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ‘मी कर्जबाजारी झालो, बोंडअळीने पीक वाया गेले,’ असेही म्हटले आहे. शंकर चायरे यांच्या मागे पत्नी, तीन मुली आणि मुलगा असा परिवार आहे. पतीच्या मृत्यूच्या धक्क्याने पत्नी अलका यांची प्रकृती अत्यवस्थ असून, त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
>पीएम, सीएम आल्याशिवाय अंत्यसंस्कार नाही
गावक-यांनी चायरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी यवतमाळ येथे आणला. शेतकरी कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार आणि चमूने शवविच्छेदन गृहापुढे ठिय्या दिला. चायरे यांच्या कुटुंबीयांना एक कोटीची मदत द्यावी, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी कुटुंबीयांना भेट द्यावी, अशी मागणी केली. या मागण्या मान्य होईपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका कार्यकर्ते आणि नातेवाइकांनी घेतली. सरकारचे धोरण फसल्यानेच पंतप्रधान मोदींच्या नावे चिठ्ठी लिहून शेतकºयाने आत्महत्या केली. यातून बोध घेऊन सरकारने संपूर्ण कर्जमाफी करावी.
- राधाकृष्ण विखे-पाटील, विरोधी पक्षनेते-विधानसभा