शेतकरी रस्त्यावर, कडकडीत बंद

By Admin | Updated: June 6, 2017 01:21 IST2017-06-06T01:21:05+5:302017-06-06T01:21:05+5:30

शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी बंदला यवतमाळ जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले होते.

Farmers on the streets, close to the rubbish | शेतकरी रस्त्यावर, कडकडीत बंद

शेतकरी रस्त्यावर, कडकडीत बंद

यवतमाळात मुंडन : भाजीपाला, दूध, टरबूज फेकले, भांबराजा, अर्जुना, कोळंबीत चक्काजाम
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी बंदला यवतमाळ जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. यवतमाळ शहरात शेतकऱ्यांनी सामूहिक मुंडन करून भाजीपाला आणि टरबूज रस्त्यावर फेकला. तालुक्यातील अर्जुना येथे शेतकऱ्यांनी सरकारचे सरण पेटवून प्रतिकात्मक निषेध केला. तर भांबराजा येथे करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाने वाहनांच्या तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. यवतमाळ शहरासह जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून कुठेही हिंसक वळण लागले नाही.
यवतमाळ शहरात शेतकऱ्यांच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीच्या नेतृत्वात बंदचे आवाहन करण्यात आले होते. स्थानिक बसस्थानक चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला मार्ल्यापण करून आंदोलनाला प्रारंभ केला. आंदोलनकर्त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्या घरासमोर घोषणा देत शासनाच्या धोरणाचा निषेध केला. त्यानंतर हुतात्मा चौकात शेतकऱ्यांनी मुंडन केले. यात कोळीचे सरपंच पांडुरंग मेश्राम, अशोक पवार, बाबाराव जाधव, सवाई जाधव, बळवंत खडतरे, ठाकूरसिंग राठोड, अनिल राठोड, हरीशचंद्र चव्हाण, भगवान सिडाम, गजानन सोनटक्के या शेतकऱ्यांनी मुंडन केले. आर्णी नाका परिसरात संतप्त शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून निषेध नोंदविला. यवतमाळ बाजार समितीत सोमवारी शेतमाल विक्रीसच आला नाही. भाजीमंडीतही शुकशुकाट दिसत होता. बाजारपेठ बंद होती. शहरातील बहुतांश व्यापारी प्रतिष्ठाने दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली होती.
शेतकऱ्यांना कर्जमाफी करा, अशी मागणी करीत मोर्चा काढणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर शहर ठाण्यात त्यांंना स्थानबद्ध करण्यात आले. सकाळी लोकजागृती मंचच्या नेतृत्वात विविध संघटना एकत्र आल्या. यामध्ये काँग्रेस शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, युवा शेतकरी संघर्ष समिती, दी बुद्धिस्ट सोसायटी, संताजी शिक्षण प्रसारक मंडळ, ओबीसी संघटना, विदर्भ मुस्लीम मोर्चा, बेंबळे-कालवे ग्रस्त समिती, स्वामिनी, बहुजन समाज पार्टी, प्रहार आदी संघटना सहभागी झाल्या. या आंदोलनाचे नेतृत्व लोकजागृती मंचचे देवानंद पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, अरुण राऊत, वसंतराव घुईखेडकर, सुरेश चिंचोळकर, वर्षा निकम, दिनेश गोगारकर, तुषार भोयर, नितीन महल्ले, मनीषा चौधरी, चेतना पवार, सुरज वाघमारे, राजू पाटील, बसपाचे राजा गणवीर, अनिल कदम, राजेंद्र गायकवाड यांच्यासह अनेकजण सहभागी झाले होते.
नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील भांबराजा येथे सकाळी ११ वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. वाहनांच्या तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. यवतमाळ-घाटंजी मार्गावरील कोळंबी फाट्यावर शेतकऱ्यांनी तासभर वाहने रोखून धरली होती. आर्णी येथील गुरुनानक ढाब्याजवळ मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी टायर पेटवून रस्ता रोको केला. महागाव तालुक्यातील हिवरासंगम येथे शेतकऱ्यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले. गुंज येथे शेतकऱ्यांनी कडकडीत बंद पाळत रस्त्यावर दूध ओतले. मुडाणा, सवना येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला. उमरखेड, बाभूळगाव, नेर, कळंब, राळेगाव येथेही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अर्जुना येथे सरकारचे सरण पेटविले
यवतमाळ तालुक्यातील अर्जुना येथे नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी सकाळी ९ वाजता रस्ता रोको केला. शेतकरी-वारकरी संघटनेच्यावतीने राष्ट्रीय महामार्गावर सरकारचे प्रतिकात्मक सरण रचून पेटवून देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री आणि सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. तब्बल तासभर चाललेल्या या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी-वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शाह, अनुप चव्हाण, अशोक भुतडा, रोहित राठोड यांनी केले. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यवतमाळ ग्रामीणचे ठाणेदार महिपालसिंह चांदा यांनी घटनास्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

Web Title: Farmers on the streets, close to the rubbish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.